आला उन्हाळा…तब्येत सांभाळा

उन्हाळा म्हणजे सुट्टीचे दिवस. सारी धम्माल. शाळेच्या परीक्षा झालेल्या असतात. त्यांचा निकाल आलेला असतो. एसएससी, बारावी, कॉलेजच्या परीक्षाही झालेल्या असल्या, तरी त्यांच्या निकालाला अजून खूप वेळ असतो, तेव्हा त्याचेही काही टेन्शन नसते. सर्वत्र सुट्ट्यांचं वातावरण असतं. गावी जायच्या किंवा बाहेर फिरायला जायच्या योजना तयार करून ठेवलेल्या असतात. ज्यांनी असे काही ठरवलेले नसते त्यांच्यासमोर दिवसभराच्या वेळेचे नेमके काय करायचे याचे विचार असतात. मित्रमंडळीही मोकळीच असल्याने त्यांची कंपनी असतेच. सारी धमालच धमाल.

फक्त एकच त्रास असतो तो म्हणजे असह्य उकाड्याचा. पंखा, एसी यांच्या संरक्षक आवरणातून जरा बाहेर पडलो की, सूर्य जणू आपली वाटच पाहात असतो. तो लगेच डोळे वटारून बघू लागतो आणि अंग भाजून काढायला सुरुवात करतो. मुंबई-कोकण या भागात समुद्राची खारी दमट हवा उन्हात मिसळल्याने घामाने डबडबायला होते, तर राज्याच्या अन्य भागात कडक उन्हाने त्वचेची सालपटे निघतात. घामोळे, गळवे येऊ लागतात. अर्थात जिथे समस्या असते तिथे उत्तरही असते. तर उन्हाळा सुसह्य करण्यासाठी काही उपाय.

बाहेर जाताना नेहमीच सुती, फिकट रंगांचे आणि सलसर कपडे घालावेत. आई-आजी तसा सल्ला नेहमीच देत असतात. तो सल्ला मानायला हरकत नाही. आता तर खास उन्हाळ्यासाठी फॅशनेबल कपड्यांचाही ट्रेण्ड आहे. दुपारच्या वेळेस उन्हात जाऊ नका, मात्र गेलातच तर स्कार्फ, टोपी अवश्‍य वापरा. टाल्कम पावडर, विशेषत: घामोळ्यांवरील पावडर वापरा म्हणजे त्वचा थंड राहते शिवाय खाज येत नाही. मात्र, घामाचा वास लपवण्यासाठी परफ्युम थेट त्वचेवर मारू नका. सूर्यकिरणांची त्याच्याशी रिऍक्‍शन होऊन त्वचेवर कायमचा डाग पडू शकतो, सनस्क्रीनचा उपयोगही करू शकता. मात्र, तुमची त्वचा तेलकट असेल तर 20 एसपीएफपेक्षा जास्त क्षमतेचे सनस्क्रीन लावू नका, कारण त्यामुळे आधीच तेल असलेल्या तुमच्या त्वचेवर अतिरिक्त रसायनांचा मारा होईल. पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला तर बाराही महिने मानायला हरकत नाही. आता तर घामामुळे खूप अधिक तहान लागते. तहान लागून घसा कोरडा पडेपर्यंत वाट पाहू नका. त्यापेक्षा थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यायला हरकत नाही. यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहील, शिवाय त्वचा कोरडी होऊन त्यावर सुरकुत्याही पडणार नाहीत. उन्हाळ्यात कलिंगडे, ताडगोळे हे अगदी विपुल प्रमाणात येतात. सर्वत्र उपलब्ध असतात. ते भरपूर खा. त्याशिवाय काकडी, गाजर, पालेभाज्या यांचा आहारात समावेश करा.

घाम
उन्हाळा म्हटले की त्यासोबत घाम हा आलाच. खरे तर शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी घाम येणे हे आवश्‍यक आहे. शरीराचे तापमान संतुलित राहण्यासाठी निसर्गाने केलेली घाम येणे ही एक यंत्रणा आहे. ती आपले काम चोख करत असते. घर्मग्रंथीमधील घाम त्वचेवर येतो, तेथून त्याचे बाष्पीभवन होण्यासाठी शरीरातील उष्णता वापरली जाते व शरीर थंड राहते. मात्र, या घामामुळे चिकचिकीत होणारे अंग व कपडे, कितीही डिओ मारला तरी घामाला येणारा वास तसेच घाम सुकल्याने येणारे रॅशेस मात्र त्रासदायक ठरतात.

घामोळे
घर्मग्रंथीमधील घाम बाहेर येऊ शकला नाही की त्वचेला सूज किंवा रॅशेस येतात त्यालाच घामोळे म्हणतात. मान, काखा, मांडया येथील त्वचा एकमेकीला स्पर्श करत असल्याने तेथे घामोळे येण्याचे प्रमाण अधिक असते. कधी त्वचेच्या रंगाचे, कधी लाल तर अतितीव्र झाल्यास पिवळ्या रंगाचे घामोळे येते. काही काळाने ते आपोआप बरे होऊ शकते. मात्र ते बरे होईपर्यंत तेथे येणारी खाज असह्य होते, त्यामुळेच ते होऊ नये यासाठी काळजी घेतली पाहिजे.

त्वचा काळवंडणे

उन्हात गेल्यावर त्वचा काळी होण्याचा प्रकार आपल्याकडे सदासर्वकाळ असतो. स्कार्फमुळे चेहऱ्याची त्वचा नीट राहिली तरी हात, पावले काळी होतात. उन्हाळ्यात ही समस्या अधिक जाणवते. खरे तर तीव्र किरणांमुळे शरीराचे नुकसान होऊ नये यासाठी त्वचेतून मेलॅनिन हे संरक्षक द्रव्य पाझरत असते. उन्हाळ्यात त्याची तीव्रता साहजिकच वाढते, त्यामुळे त्वचा टॅन दिसू लागते. पाश्‍चिमात्य देशात त्वचा टॅन करून घेण्याची फॅशन असली, तरी आपल्याकडे मात्र त्वचेचा मूळचा रंग कायम ठेवण्यासाठी धडपड केली जाते. त्वचा जशी एका दिवसात काळवंडत नाही, तशीच एका दिवसात मूळ रंगही परत येत नाही. त्याला आठवडा लागतो, मात्र लग्नाचा सीझन असल्याने काही वेळा ब्लिचिंगसारखे “पी हळद, हो गोरी’ प्रकार केले जातात. मात्र त्यामुळे कोरडी त्वचा, ऍलर्जी होण्यासारखे दुष्परिणामही दिसून येतात.

सन बर्न

सूर्याचे किरण त्वचेच्या थेट आतील थरापर्यंत जाऊन त्वचेचे नुकसान करतात. दुपारच्या वेळेत कडक उन्हात राहिल्यास त्वचा लालसर पडून आग होते. काही वेळा पाण्याचे फोडही येतात. करपलेली ही त्वचा आठ ते दहा दिवसांत निघून जाते. काही वेळा मान, गळ्याकडील भाग येथे पुरळही येते. मात्र सन बर्न टाळण्यासाठी सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत शक्‍यतो कडक उन्हात बराच काळ राहू नका. त्यापेक्षा घरीच आराम करा, झोप काढा किंवा इनडोअर गेम्स खेळा. काही छंद जोपासा. हे सर्वात उत्तम!

डॉ. प्रज्ञा

Leave A Reply

Your email address will not be published.