राजस्थानची सुमन राव ठरली “मिस इंडिया’

मुंबई- राजस्थानातील “सीए’ची विद्यार्थिनी असलेली सुमन राव ही यंदाची “मिस वर्ल्ड 2019’ठरली आहे. काल सरदार वल्लभभाई पटेल इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या समारंभामध्ये ही घोषणा करण्यात आली. छत्तीसगडची अभियांत्रिकीची विद्यार्थिनी असलेल्या शिवानी जाधव हिला “मिस ग्रॅन्ड इंडिया 2019′ तर बिहारची व्यवस्थापनशास्त्राची विद्यार्थिनी श्रेया शंकर हिला “मिस इंडिया युनायटेड कंटिनेन्टस 2019’किताबाने गौरवण्यात आले. तेलंगणची संजना विज ही “मिस इंडिया’ किताबाची उपविजेती ठरली.

आपण प्रतिनिधीत्व करत असलेल्या समाजासाठी आता आशेचा किरण बनल्यासारखे आपल्याला वाटू लागले आहे. आता माझ्यासारख्या मुलींना आपले स्वप्न पूर्ण करण्याची भीती वाटणार नाही, असे सुमन राव हिने “मिस इंडिया’चा मुगुट परिधान केल्यानंतर सांगितले.

प्रसिद्ध डिझायनर फाल्गुनी – शेन पीकॉक. 2018 ची “मिस वर्ल्ड’ वनेसा पोन्का द लिओन, अभिनेत्री हुमा कुरेशी, चित्रांगदा सिंह, आयुष शर्मा, नृत्यदिग्दर्शक-चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसोझा, धावपटू द्युत्ती चंद आणि फुट्‌बॉल संघाचा कर्णधार सुनिल छेत्री यांच्या पॅनेलने अंतिम फेरीतील स्पर्धक सौंदर्यवतींमधून विजेत्यांची निवड केली.

या समारंभाच्यावेळी कतरिना कैफ, विकी कौशल, नोरा फतेही आणि मौनी रॉय यांचे नृत्याविष्कार सादर झाले. बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेता मनिष पॉल यांच्यासह 2017 ची “मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.