सुलेमानी खडा, ‘राईस पुलर स्कॅम’चा पुण्यातूनही ‘धूर’

दिल्ली, हैद्राबादपाठोपाठ अनेकांची फसवणूक


आजी-माजी नगरसेवक व बड्या व्यक्तींनाही गंडा


वैज्ञानिकांना बोलावून दाखविले जायचे प्रात्यक्षिक


खडा जवळ बाळगल्यास शारीरिक इजा न होण्याचा दावा

पुणे – “सुलेमानी खडा’ आणि “राईस पुलर’च्या नावे फसवणूक प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्‍यता आहे. दिल्ली आणि हैद्राबादपाठोपाठ पुण्यातही अशा प्रकारे काही जणांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. यामध्ये आजी-माजी नगरसेवक आणि बड्या व्यक्‍तींचाही समावेश असण्याची शक्‍यता आहे. बदनामी होऊ नये, म्हणून काही व्यक्‍ती तक्रार देण्यास पुढे येत नसल्याचे पोलीस सांगत आहेत. याप्रकरणात तीन आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत.

हे प्रकरण 14 जानेवारी रोजी डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. यामध्ये श्रीनिवास आईतनी यांची 40 लाख रुपयांची फसवणूक झाली होती. त्यांना आरोपीने “राईस पुलर’ची मोठ्या रकमेला विक्री होत असल्याचे पटवून देऊन 40 लाख रुपये लाटले होते. याप्रकारे संजय थोरात यांचीही 29 लाख 50 हजारांची फसवणूक करण्यात आली. त्यांना तोंडओळखीचा असलेल्या विलास राऊत याने त्याचा “मित्र मुजिब पिंजारी याच्याकडे “सुलेमान खडा’ असून त्याची विक्री केल्यास खूप मोठी रक्कम मिळू शकते’ असे सांगितले होते. त्यानुसार पुण्यात संजय थोरात यांची एका हॉटेलमध्ये मुजिब व त्याच्या आणखी तीन साथीदारांबरोबर ओळख करुन दिली. मुजिब याने त्याच्याकडील चॉकलेटी रंगाचा खडा दाखवून “हा सुलेमानी खडा जवळ असल्यास माणसाला कोणतीही शारीरिक इजा होत नाही. जवळ बाळगल्यास कोणत्याही शस्त्राने वार केल्यास जखम होत नसल्याचे’ सांगत डेमो दाखवला. यानंतर सुलेमानी खड्याची वैज्ञानिक तपासणी करावी लागले, यासाठी बाहेरचे वैज्ञानिक बोलवावे लागतील, असा बहाणा केला. हा दोन कोटी रुपयांचा खडा तपासण्यासाठी भुवनेश्‍वर येथील वैज्ञानिक बोलवण्यासाठी तीन लाख रुपये घेण्यात आले. यानंतर वेळोवळी त्याला 15 लाख रुपये देण्यात आले. यानंतर खड्याचे तापमान ठीक नसल्याचे सांगत त्याच्या तपासणीसाठी “राईस पुलर’ व विशिष्ट रसायन लागेल, असे सांगण्यात आले. यासाठी आणखी 14 लाख 50 हजार रुपये घेण्यात आले. याप्रकारे 29 लाख 50 हजार रुपये घेऊन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणात मुजिब पिंजारी व रविंद्र शर्मा यांना आरोपी केले गेले आहे. त्यांच्या मागावर डेक्‍कन पोलिसांचे पथक आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस.के.सोनवणे करत आहेत.

… तो तथाकथित वैज्ञानिक कोण?
“राईस पुलर’ला परदेशात दोन ते अडीच कोटी रुपयांची किंमत असून तेथून मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे आरोपी भासवत असत. हा “राईस पुलर’ 30 ते 40 लाखांत उपलब्ध करुन देण्याचे आमिष दाखवले जात होते. यासाठी डेक्कन परिसरातील एका हॉटेलामध्ये “डेमो’ दाखवला जात होता. या ठिकाणी एक तथाकथित वैज्ञानिकही उपस्थित असे. तो “राईस पुलर’मध्ये काही केमिकल टाकून त्यातून धुर काढून सुलेमानी खड्याची ताकद दाखवत होता. यावर विश्‍वास ठेऊन अनेकांनी लाखो रुपये आरोपीला दिले आहेत. पोलिसांनी आजवर तीन “राईस पुलर’ आणि एक सुलेमानी खडा ताब्यात घेतला आहे. तसेच हॉटेलमधील आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज व “डेमो’चे फुटेजही मिळवले आहेत. याप्रकरणी दिल्ली आणि हैद्राबादमध्ये अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे. तीच पद्धत पुण्यात वापरली गेल्याचे सूत्रांनी सांगितले.

राईस पुलर, सुलेमानी खडा म्हणजे काय?

राईस पुलर हे चायनीज फेंगशुई भांडे आहे. यामध्ये मौल्यवान खडा ठेवला जातो. यानंतर त्यामध्ये काही विशिष्ट केमिकल टाकले जाते. यामुळे धुर निघतो. यामुळे सुलेमानी खड्याची ताकद वाढली जाते, असा दावा केला जातो. हा खडा जवळ बाळगल्यास माणसाला कोणतीही शारीरीक इजा होत नाही; कोणत्याही शस्त्राने वार केला तरी जखम होत नाही, असा दावा आरोपी करत होते. यासाठी ते डेमो दाखवून दिशाभूल करत होते. हा खडा आणि राईस पुलर ते 30 ते 40 लाखांत माथी मारत होते. याला परदेशात दोन कोटींची किंमत मिळते. त्यासाठी परदेशातील ग्राहक मिळवून देण्याचेही आश्‍वासन आरोपी देत होते. प्रत्यक्षात राईस पुलर आणी खड्याची किंमत चार ते पाच हजार रुपये इतकीच असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)