पुणे: विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजपला विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली आहे. त्यानंतर विधानसभेच्या विरोधी पक्षनेता म्हणून दवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. पण विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेता पदासाठी पक्षांतर्गत रस्सीखेच सुरु झाली. भाजप नेते सुजितसिंह ठाकूर यांनाच विरोधी पक्षनेते पदी निवडणार असल्याची शक्यता सर्वांकडून वर्तविण्यात येत होती. परंतु ऐनवेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून भाजपात आलेले प्रवीण दरेकर यांच्या गळ्यात हि माळ पडली आहे.
दरेकर यांच्या निवडीनंतर राजीय वर्तुळात चर्चाना उधाण आले असून, भाजपमध्ये जाणीवपूर्वक निष्ठावंतांना डावलण्यात येत असल्याचा सूर कार्यकर्त्यांमधून निघत असल्याचे चित्र आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वाखाली राजकीय डावपेच शिकलेले ठाकूर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. त्यामुळे तेच विरोधीपक्षनेता होणार असल्याचे बोलले जात होते. परंतु पक्षांतर्गत राजकारणामुळेच ठाकूर याना डावलल्यात आल्याची चर्चा आता राजीव वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान,१२ डिसेंबर रोजी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या जयंती निमित्त गोपीनाथ गडावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात एकनाथ खडसेंसह पंकजा मुंडेंनीही पक्ष नेतृत्वाबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली होती. या मेळाव्याला सुजितसिंह ठाकूरही उपस्थित होते. त्यामुळे या मेळाव्याला उपस्थित राहणे भाजपतील नेत्यांना खटकले असून, त्यामुळेच ठाकूर यांना डावलण्यात आले असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.