नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात 19 उमेदवार रिंगणात
नगर: नगर लोकसभा निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सात जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे निवडणूक रिंगणात 19 उमेदवार राहिले आहेत. असे असले तरी खरी लढत भाजपचे डॉ. सुजय विखे व राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांच्यात आहे. या चुरशीच्या होणाऱ्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
आज अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सबाजीराव महादू गायकवाड (अपक्ष), गौतम काशिनाथ घोडके (अपक्ष), रामकिसन गोरक्षनाथ ढोकणे (अपक्ष), सुदर्शन लक्ष्मण शितोळे (अपक्ष), शेख रियाजोद्दीन फजलोद्दीन दादामियॉं (अपक्ष), गणेश बाळासाहेब शेटे (अपक्ष), सुनील शिवाजी उदमले (अपक्ष) यांनी माघार घेतली. त्यामुळे 19 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. त्यात नामदेव अर्जुन वाकळे (बहुजन समाज पक्ष), डॉ.सुजय राधाकृष्ण विखे-पाटील (भाजप), संग्राम अरूणकाका जगताप (राष्ट्रवादी कॉंग्रेस), कलीराम बहिरू पोपळघट (भारतीय नवजवान सेना), धीरज मोतीलाल बताडे (राईट टू रिकॉल पक्ष), फारूख इस्माईल शेख (भारतीय प्रजा सुराज्य पक्ष), सुधाकर लक्ष्मण आव्हाड (वंचित बहुजन आघाडी), संजय दगडू सावंत (बहुजन मुक्ती पक्ष), आप्पासाहेब नवनाथ पालवे (अपक्ष), कमल दशरथ सावंत (अपक्ष), दत्तात्रय आप्पा वाघमोडे (अपक्ष), भास्कर फकिरा पोटोळे (अपक्ष), रामनाथ गहिनीनाथ गोल्हार (अपक्ष), शेख आबीद मोहम्मद हनीफ (अपक्ष), साईनाथ भाऊसाहेब घोरपडे (अपक्ष), सुपेकर ज्ञानदेव नरहरी (अपक्ष), संजीव बबन भोर (अपक्ष), संदीप लक्ष्मण सकट (अपक्ष), श्रीधर जाखुजी दरेकर (अपक्ष) हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
19 उमेदवारांमुळे बॅलेट युनिटचा बोजा वाढणार
नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीचे चित्र आज सोमवारी (ता. 8) अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट झाले. निवडणुकीच्या रिंगणात 19 उमेदवार असल्याने बॅलेट युनिटची संख्या आणखी एकने वाढली आहे. बॅलेट युनिटवर 16 पेक्षा जास्त उमेदवारांची नावे राहिल्याने प्रत्येक मतदान केंद्रावर आता दोन बॅलेट युनिट मशिन लागणार आहेत. परिणामी मतदान केंद्र अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरीक्त बॅलेट युनिट संभाळण्याचा बोजा पडला आहे. नगर दक्षिणमध्ये 2 हजार 19 मतदान केंद्र आहेत. त्यानुसार 4 हजार 38 बॅलेट युनिट जिल्हा प्रशासनाला लागणार आहेत. नगर दक्षिणेत 19 लाख 31 हजार 537 मतदार आहेत.