राहुरी – राहुरी तालुक्यातील खडांबे शिवारात अजनी-पुणे या रेल्वेखाली दोन महिला व एक लहान मुलाने आत्महत्या केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. पोलीस सूत्रांची माहिती अशी की, सोमवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास अजनी-पुणे एक्सप्रेस रेल्वे राहुरीवरून नगरच्या दिशेने जात असताना खडांबे शिवारात आल्यानंतर वर्षा अंबादास ठुबे (वय 43), मुलगा अनुप बिरजाशंकर तिवारी (वय 9, सर्व राहणार केडगाव, जि.अहमदनगर) व एक अनोळखी महिला (वय 50) या तिघांनी एकत्रित आत्महत्या केली.
याप्रकरणी अजनी-पुणे एक्सप्रेस चालकांनी तात्काळ वांबोरी रेल्वे स्टेशनला दोन महिला व एक मुलाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची माहिती दिली. त्यानंतर तत्काळ नगर रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक देवीचंद बाविस्कर, पोलीस उपनिरीक्षक मालोजी कांबळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय लांडगे, अरुण पिंगळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला आहे. मृतदेह नगर येथील शासकीय रुग्णालयात येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठवून देण्यात आले.