नगर – हातगाडीची हवा सोडल्याच्या क्षुल्लक कारणावरून माळीवाड्यातील कबाडगल्लीत कोयत्याने हाणामारी झाली. गुरूवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांत परस्परविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
बागवान बाप-बेटे अटकेत अमीना अब्दुलरौफ बागवान, (फळ व्यवसाय, रा. कबाडगल्ली, पांचपीर चावडी) यांच्या फिर्यादीत इम्रान मेहबूब बादशाह शेख, वाहिद मेहबूब शेख, जावेद मेहबूब शेख, जहांगीर मेहबूब शेख, मुनाफ कादर शेख यांच्याविरोधात दंगल, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमीना बागवान यांचा फळ विक्रीचा व्यवसाय असून त्यासाठी त्यांच्याकडे हातगाडी आहे. इम्रान शेख याने हातगाडीचे चाकाची हवा सोडली. हवा का सोडली अशी विचारणा केली असता आरोपींनी शिवीगाळ करत लाकडी दांडक्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अमीना तसेच त्यांचे पती अब्दुल आणि मुलास मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दुसरी फिर्याद वाहिद मेहबूब शेख उर्फ लाला कुरेशी (हमाली, रा. कबाडगल्ली) यांनी दिली आहे. त्यावरून पोलिसांनी एजाज अब्दुलरौफ बागवान, वसीम अब्दुलरौफ बागवान, अब्दुलरौफ बागवान, अमीना अब्दुलरौफ बागवान, फिरोज बागवान यांच्या विरोधात खुनी हल्ल्याच्या गुन्हा दाखल केला आहे. गुरूवारी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास माळीवाड्याच्या पंचपीर चावडीजवळील कबाडगल्लीत ही घटना घडली. पोलिसांनी एजाज अब्दुलरौफ बागवान, आणि अब्दुलरौफ बागवान या दोघांना अटक केली आहे. लाला कुरेशी यांचा पुतण्या अम्मार यास लहान मुलांचे भांडणाचे कारणावरून एजाज बागवान याने चापट मारली. त्याची विचारपूस करण्यास गेलेल्या वाहिद यांना शिवीगाळी दमदाटी करत “आज याचा विषय संपवून टाकू’ असे म्हणत मारहान करण्यात आली.