करमाळा – विवाहित महिलांना सासरच्या मंडळीकडून त्रास देण्याच्या घटना आपण नेहमीच ऐकतो. अनेकदा हुंड्यासाठी विवाहितांचा छळही करण्यात येतो. या त्रासातून अनेक महिलांना आपलं जीवन संपवलं आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे एका तरुणाने पत्नी आणि तिच्या घरच्यांच्या त्रासाला कंटाळून एका युवकाने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.
पत्नीला नांदायला न पाठवणे आणि जमीन नावावर करून देण्यासाठी तगादा लावणे अशा विविध कारणातून मानसिक छळ केल्यानं संबंधित तरुणाने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. अभिजित कांतीलाल घोगरे असं आत्महत्या करणाऱ्या 32 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो करमाळा तालुक्यातील सरपडोह येथील रहिवासी आहे.
अभिजीत घोगरे आणि त्याची सासरची मंडळी यांच्यात अनेक दिवसांपासून मतभेद होते. सासरच्यांकडून अभिजीतचा मानसिक आणि शारिरीक छळ कऱण्यात येत होता. अभिजीतची पत्नी काही दिवसांपूर्वीच काहीही कारण न सांगता, माहेरी गेली होती. त्यानंतर पत्नीला परत आणण्यासाठी अभिजीतने अनेक प्रयत्न केले. मात्र सासरच्यांनी पत्नीला पाठविण्यास नकार दिला.
दरम्यान सासरच्यांकडून मुलीच्या नावावर जमीन करून देण्यासाठी तगादा लावण्यात आला. तसेच जावयाकडून घर बांधण्यासाठी घेतलेले पैसेही परत केले नाही.
सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून अभिजीतने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. या प्रकरणी मृताची पत्नी आणि तिच्या घरच्यांविरुद्ध तक्रार दाखल केली.