भोपाळ – ऑनलाइन गेममध्ये 40 हजार रुपये गमावल्याने 13 वर्षीय मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील छतरपूर येथे घडली. याआधी जानेवारी महिन्यात देखील मध्यप्रदेशात अशाच गेममुळे 12 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती.
पोलिस उपाधीक्षक शशांक जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. घटनास्थळी एक सुसाईड नोट मिळाली आहे. त्याने आईच्या खात्यातून 40 हजार रुपये काढले आणि ते पैसे फ्री फायर गेममध्ये गमावले. या कारणामुळे आत्महत्या करत असल्याचे मुलाने सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे. तसेच त्याने आईची माफीही मागितली. मुलाने आत्महत्या केली त्यावेळी घरी तो एकटा होता. त्याची आई आरोग्य विभागात नर्स आहे. घटनेवेळी त्या जिल्हा रूग्णालयात होत्या.
अकाउंटवरून पैसे गेल्याचा संदेश मुलाच्या आईला आला. यासाठी त्यांनी मुलाला फटकारले होते. त्यानंतर मुलाने स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतले. काही वेळाने त्याची मोठी बहिण तेथे पोहोचली असता दरवाजा आतून लाॅक केल्याचे दिसले. तिने आई-वडिलांना कळवले. काही वेळाने दरवाजा तोडला असता मुलाचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला.
ऑनलाइन शिक्षणामुळे लहान मुलांच्या हातात मोबाईल आले आहेत. आपली मुलं मोबाईलवर काय सर्च करतात, कोणता गेम खेळतात यावर लोकांनी लक्ष ठेवले पाहिजे. मोबाईल हा जीवघेणा ठरू नये असे पोलिसांनी आवाहन केले आहे.