बाबा आमटे यांच्या नातीचा संशयास्पद मृत्यू

कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याची संशय समाज माध्यामातून व्यक्‍त

चंद्रपूर – प्रख्यात समाजसेवक बाबा आमटे यांच्या कुटुंबीयांतील मतभेद चव्हाट्यावर आल्यानंतर त्यांची नात डॉ. शीतल आमटे-करजगी यांचा चंद्रपूर शासकीय रुग्णालयात आज सकाळी मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू हा आत्महत्या आहे का? याचा पोलीस तपास करत आहेत.
वरोरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक खोब्रागडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल यांच्या प्रकृती खालावल्याने त्यांना चंद्रपूर शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला. खोब्रागडे यांना त्यांनी आत्महत्या केली का? असे थेट विचारता त्यांनी मी त्याला दुजोरा देऊ शकत नाही, असे सांगितले.

डॉ. शीतल यांचे त्यांचे मोठे बंधू कौस्तुभ यांच्याशी गंभीर स्वरूपाचे मतभेद होते. त्यांनी कौस्तुभवर अनियमिततेचे आरोप केले होते. कौस्तुभ यांनी पाच वर्षापूर्वी या विश्‍वस्त निधीचा राजीनामा देऊन त्यानंतर आनंदवनही सोडले होते. त्यानंतर वडील विकास आणि काका प्रकाश यांनी कौस्तुभला पुन्हा आनंदवनचे काम सुरू ठेवण्यास राजी केले होते.

डॉ. शीतल आणि त्यांचे पती गौतम करजगी यांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला होता. त्यांनी प्रकाश आमटे, त्यांचा पुत्र अनिकेत आणि अन्य काही जणांवर गंभीर आरोप करणारा व्हिडिओ समाज माध्यमांत अपलोड केला होता. नंतर तो काढून टाकण्यात आला.

कौस्तुभ यांच्या राजीनाम्यानंतर त्यांनी संस्थेतील काही जुन्या जाणत्या लोकांनाही संस्थेतून बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे त्यांच्यावर संस्थेचे व्यावसायिकरण केल्याचे आरोप झाला. हा आरोप त्यांनी खोडून काढला. संस्था जगवायची असेल तर हे बदल करावे लागतील. हे बदल म्हणजे व्यावसायिकरण नव्हे, असे त्या म्हणाल्या होत्या. त्यांचा आणि त्यांच्या पतीच्या बेसुमार हस्तक्षेपाचा आरोप त्यांनी फेटाळला होता.

वडील विकास, आई भारती, काका प्रकाश आणि काकू मंदाकिनी यांनी काही दिवसांपूर्वी एक निवेदन प्रसिद्धीस दिले होते. त्यात त्यांनी डॉ. शीतल यांच्या संस्थेतील कार्याची प्रशंसा केली होती. मात्र, त्यांनी केलेले सारे आरोप फेटाळून लावले होते. त्या तणावाखाली असून त्यांना नैराश्‍य आल्याचे त्यांनी या निवेदनात म्हटले होते.

रविवारी एका पत्रकाराला त्यांनी मतभेद संपल्याचा मेसेज व्हॉट्‌स ऍपवर पाठवला होता. त्यानंतर कौस्तुभ यांना आनंदवनमध्ये घेऊन त्यांच्याकडे सोमनाथ प्रकल्प सोपवण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले होते.

प्रकाश आमटे यांनीही डॉ. शीतल यांच्या मृत्यूने धक्‍का बसल्याचे सांगितले. ते म्हणाले, मी रविवारी गौतमशी बोललो. या मुद्‌द्‌यावर तोडगा काढल्याबद्दल त्यांनी माझे आभार मानले. त्यानंतर काही तासांत काय झाले याची मला कल्पना नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.