औरंगाबाद: येथील हर्सुल कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. साळुजी यादव मगरे असे या कैद्याचे नाव आहे. त्याने ब्लॅंकेटच्या सहाय्याने गळफास लाऊन कारागृहाच्या स्वच्छता गृहात आत्महत्या केली. रविवारी पहाटे हा प्रकार निदर्शनाला आला अशी माहिती कारागृह अधिक्षक हिरालाल जाधव यांनी सांगितली.
मगरे हा जालना जिल्ह्यातील ठाकुरवाडीचा रहिवासी होता. आपल्या पत्नीच्या हत्येबद्दल त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तो 23 जानेवारी 2015 पासून कारागृहात होता. पहाटे तो स्वच्छतागृहात जाण्याच्या बहाण्याने बराकीतून बाहेर पडला. आपल्या ब्लॅंकेटचा एक तुकडा त्याने एक्झॉस्ट फॅनला अडकवून त्याने गळफास लाऊन घेतला. आपल्या विरूद्धच्या खटल्यात आपल्या मुलांनीच आपल्या विरोधात साक्ष दिल्याने तो अस्वस्थ होता असे त्याच्या कुटुंबियांनी सांगितले.