जम्मू: जम्मू काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यामध्ये हवाई दलातील जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. शुभम सिंह परमार असे या 22 वर्षीय जवानाचे नाव आहे.
शनिवारी उधमपूर येथील हवाई दलाच्या स्थानकावर तो पहाऱ्यावर असताना त्याने आपल्या सर्व्हिस रायफलमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याने आत्महत्या करण्यामागील नेमके कारण समजू शकलेले नाही.
या जवानाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उधमपूर येथील जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवून देण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. परमार हे उत्तर प्रदेशातील कानपूर येथील रहिवासी होते.