मुंगेली – छत्तीसगड मधील मुंगेली जिल्ह्यात 55 वर्षीय महिला जिल्हा न्यायाधिशाने गळफास लाऊन आत्महत्या केल्याचे उघडकीला आले आहे. न्या कांता मार्टिन असे त्यांचे नाव आहे.
त्यांनी आपल्या सरकारी निवासस्थानीच पंख्याला गळफास लाऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. काल रात्री त्यांनी आपल्या निवासस्थानी भोजन घेतल्यानंतर त्यांनी आपल्या बंगल्यावरील सर्व कर्मचाऱ्यांना घर सोडून जाण्यास सांगितले होते.
आज सकाळी त्यांचा स्वयंपाकी घरी आला असता त्याला घर आतून बंद असल्याचे आढळून आले. त्यांनी एका खोलीच्या उघड्या खिडकीतून डोकावले असता त्यांना सदर न्यायाधिश पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसून आल्या. त्यांच्या पतीचे गेल्या वर्षीै निधन झाले आहे. तेव्हा पासून त्यांना नैराश्य आले होते असे त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.