वर्धा – विदर्भातील वर्धा जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यातील परिचारकाने कार्यालयातच पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली आहे. एमपीएससी परीक्षेत अपयश आल्यामुळे नैराश्यात गेल्याने या परिचारकाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. आत्महत्येपुर्वी पोलिसांना एक सुसाईड नोट मिळाली आहे त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आर्थिक मदतची मागणी केली आहे. ही घटना जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील नागझरी येथे घडली आहे.
किसन ढगे, वय 29 असे आत्महत्या केलेल्या परिचारकाचे नाव असून तो परभणी येथील रहिवाशी आहे. किसन हा नागझरीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात गेल्या सात वर्षांपासून शिपाई पदावर कार्यरत होता. एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करुन मोठ्या पदावर जाण्याचे त्याचे स्वप्न होते. यासाठी तो सतत अभ्यास करीत होता. दवाखान्यात कार्यरत सुपरवायझरकडून त्याला अभ्यासाकरिता सहकार्य केले जात होते.
स्पर्धा परिक्षेची तयारी करत असताना याआधी किसनची पोलीस उपनिरीक्षक बनण्याची संधी अतिशय कमी गुणाने हुकली. परंतु याच परीक्षेत त्याच्या मित्रांना यश मिळाल्याने किसन दु:खी झाला होता. घटनेच्या दिवशी त्याने मित्रांसोबत देवळीत जेवण केले. त्यानंतर नागझरी येथील दवाखान्यात रुजू होताच त्याने फेसबुकवर पोस्ट टाकून नोकरीचा भरती घोटाळा तसंच आरोग्यमंत्री आणि संबंधित मंत्री यांच्या कार्यपद्धतीचा निषेध करुन आत्महत्या करीत असल्याचे कळविले.
किसनची ही पोस्ट त्याच्या मित्रांनी फेसबुकवर पाहिल्यानंतर त्याच्या मित्रांनी तातडीने नागझरी गाठले मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. किसनेने कार्यालयातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ झाला किसन बाहेर न आल्यामुळे रुममध्ये जाऊन पाहणी केली असता त्याचा मृतदेह आढळून आला.
आई-वडिलांनी शेती विकून माझ्या शिक्षणावर खर्च केला पण, अपेक्षित नोकरी मिळत नाही. एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नात अपयश आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या घरच्यांना आर्थिक मदत करावी. अशी मागणी सुद्धा किसनचे सुसाईड नोटमध्ये केली आहे.