पिंपरी – मटणाची भाजी सांडल्याने वडील रागावले. या कारणावरून चौथीत शिकणाऱ्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. 21) दुपारी चिखली येथे उघडकीस आली.
व्यंकटेश लक्ष्मण पुरी (वय 10, रा. श्रीकुंज हौसिंग सोसायटी, मोरेवस्ती, चिखली) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. सोमवारी व्यंकटेश याच्याकडून मटणाची भाजी सांडल्याने वडील रागवले. या रागविण्याचा राग व्यंकटेशला आला. मंगळवारी सकाळी त्याचे आईवडील कामानिमित्त बाहेर गेले असता त्याने बाथरूमच्या भिंतीवर चढून ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास त्याचे वडील लक्ष्मण हे घरी आल्यावर आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला.
व्यंकटेश याचे वडील टॅक्सी ड्रायव्हर असून, आई धुणीभांड्याचे काम करते. मयत व्यंकटेश याच्या तीन वर्षांची लहान बहिणीने दादाने कशी आत्महत्या केली, याबाबत आईवडिलांना सांगितले. व्यंकटेश आकुर्डीतील महात्मा फुले इंग्लिश स्कूलमध्ये चौथी इयत्तेत शिकत होता.
रविवारी चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रुपीनगर येथे एका 20 वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने वडील रागविल्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर हा दुसरा प्रकार घडल्याने पालकांच्या मनात मुलांच्या भवितव्याबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.