आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्याची आत्महत्या

जालना – राज्यात यंदा पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपीकांचे प्रचंड नुकसान झाले. तोंडचा घास हिरावला गेला. त्यामुळे डोक्यावर असलेलं कर्ज कसं फेडायचं हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. पीकाचे नुकसान झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. अशातच अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील एका शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. रामभाऊ नारायण कदम (वय 55) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी शेतीपिकांचे नुकसान झाल्याने आत्महत्या केल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.

अतिवृष्‍टीमुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. उत्‍पन्‍न शुन्‍य झाले. यात बँकेकडून कर्ज घेतले असल्‍याने ते फेडायचे कसे? हा प्रश्‍न देखील त्‍यांच्‍यासमोर होता. यामुळे हतबल झालेल्‍या शेतकरी रामभाऊ यांनी घरात गळफास लावून आत्महत्या केली. घटनेनची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी पोलिस दाखल झाले. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

रामभाऊ कदम यांची 10 एकर शेती आहे. त्यांनी ऊस पिकांची लागवड केली होती. मात्र परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेताजवळ असलेल्या गलाटी नदी पात्राला आलेल्या महापुरामुळे शेती पूर्णपणे खरडुन गेली. ते गेल्या काही दिवसांपासून उदास होते. त्यांच्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँक गोदी शाखेचे कर्जही होते. ते फेडायचे कसे? या विवंचनेतूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, राज्य शासनाने अनुदानाची रक्कम जाहीर केली असून दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फुल नाही तर फुलाची पाकळी अशी मदत होणार आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.