नगर (प्रतिनिधी) – यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडप्रकरणातील मुख्य संशयित सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला काल पोलिसांनी अटक केली. त्यावेळी पोलिसांना बोठे याच्या खिशात आत्महत्या करणार असल्याची चिठ्ठी सापडली, अशी धक्कादायक माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. दरम्यान, बोठे याने पळून जाण्यासाठी हे कृत्य केले असावे. त्यामुळे पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असल्याचेही पोलीस अधीक्षक पाटील म्हणाले.
आरोपी बाळ बोठे हैद्राबाद येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर सरुवातील त्याचा शोध घेण्यासाठी दोन पथके रवाना केली. त्या पथकाने दोन दिवस रेकी केल्यानंतर खात्री पटली, की आरोपी बोठे तिथेच दडून बसला आहे. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यासाठी पुन्हा दोन पथके पाठविली. तथापि, संशयित आरोपी बोठेचा वावर असलेला परिसर गुन्हेगारांचा असल्याने सुरक्षिततेसाठी जास्तीचे संख्याबळ असणे आवश्यक होते. त्यामुळे आणखी दोन पथके रवाना केली.
दरम्यान, संशयित आरोपी बाळ बोठे याला मदत करणारा वकील पोलीस पथकाच्या हाती लागल्यानंतर बोठे याचा ठावठिकाणा लागला. पोलिसांनी छापा घातल्यानंतर बोठे याने तीन वेळा ठिकाण बदलेले. शेवटी बिलालनगरमधील त्या हॉटेलमधील खोलीचा दरवाजा तोडून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ताब्यात घेतले.
आरोपीला ताब्यात घेल्यानंतर तो तेथील स्थानिक न्यायालयात हजर करा, अशी विनंती करीत होता. मात्र, सुरक्षिततेच्या दृष्टिकानोतून खासगी वाहनाने आरोपीला तत्काळ नगरला आणले. गुन्ह्यात पसार असलेली आरोपी महिला ही संबंधित आरोपी वकिलांची सहायक आहे. आरोपी बोठे पत्रकार व वकील असल्याने खूपच चालाख आहे. त्यामुळे पोलीस सर्व बाजूंची शहानिशा करून तपास करीत आहेत.
बोठे याला ताब्यात घेल्यानंतर त्याच्या खिशात एका पानाची चिठ्ठी सापडली. त्यामध्ये माझा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास माझ्या कुटुंबियांना संपर्क करावा, असा मजकूर लिहिलेला आहे. ती चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे. याला तिथे आणखी कोणी मदत केली आणि नगरमधून आरोपी महेश तनुपरे वगळता अन्य कोणी मदत केली का? याचा पोलीस शोध घेत आहेत.
सोलापूरला केल्या वैद्यकीय चाचण्या
संशयित आरोपी बाळ बोठे याला हैद्राबाद येथील बिलालनगरमधून ताब्यात घेल्यानंतर पोलिसांनी तेथील स्थानिक वाहनातून त्याला नगरला आणले. रस्त्यात आरोपी बोठे सतत वैद्यकीय तक्रारी करीत होता. छातीत त्रास होत असल्याचे सांगत असल्याने सोलापूरमधील एका खासगी रुग्णालयात त्याच्या काही चाचण्या केल्या.
मदतीसाठी मोठी किंमत
संशयित आरोपी बाळ बोठे याला हैद्राबाद येथे त्या वकिलाने मदत केली. गुन्हेगारी भागात राहणार्या अशा अनेक टोळ्या तिथे कार्यरत आहेत. त्याने मदतीसाठी मोठी रक्कम घेतली असल्याचा संशय आहे. त्याबद्दल्यात मोबाईल, टॅब, सीमकार्ड अशा वस्तूंची व्यवस्था केली जाते. त्या वकिलांबरोबर बोलण्यासाठी एक भाषांतरकाराची मदत पोलिसांनी घेतली.
फरार नसल्याचा कांगावा
मी फरार नसून पोलिसांच्या संपर्कात आहे, असे दाखविण्यासाठी संशयित आरोपी बोठे आरोपी असलेल्या वकिलाच्याच मदतीने तेथील पोलीस आयुक्तालयातही जाऊन आला. मात्र, अवघ्या काही मिनिटांत तेथून तो पसार झाला. सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यासाठी त्याची पळापळ सुरू होती.
शोधासाठी अनोखे पथक
संशयित आरोपी बाळ बोठे याच्या शोधासाठी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अनोखी पाच पथक तयार केले होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अथवा शहर पोलीस ठाण्यातील एकही अधिकारी, कर्मचारी पथकात नव्हता. कर्जत, जामखेड, एमआयडीसी व नगर तलुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी व सोलापूर येथील पोलीस उपअधीक्षकांचा पथकामध्ये समावेश होता. त्या कर्मचार्यांचा आज पोलीस अधीक्षक पाटील यांनी उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रशंसापत्र देऊन गौरव केला. तपासाठी असलेल्या सहा पथकांना वेगवेगळी रिवार्ड देऊनही सन्मानित करण्यात येणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.
सात दिवस पोलीस कोठडी
संशयित आरोपी बाळ बोठे याला काल सायंकाळीच सुपा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. आज सकाळी तपासी अधिकारी अजित पाटील यांनी त्याला पारनेर येथील न्यायालयात हजर केले. त्याला आज न्यायालयाने सात दिवस (दि. 20) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
आरोपी सागर भिंगारदिवे व बाळ बोठे यांच्या किती वेळा व कोठे मिटिंग झाल्या. सुपारी नेमकी किती रुपयांची दिली होती. गुन्ह्यात कोणत्या वाहनाचा वापर करण्यात आला, त्याचा तपास करावयाचा असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी तपासी अधिकारी पाटील यांनी केली. न्यायालायाने त्यांची विनंती मान्य करीत आरोपीला वीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली.