प्रेयसीसमोरच केली आत्महत्या

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलीस स्टेशनअंतर्गत चौदा मैल परिसरात प्रियकर आणि त्याची प्रेयसी यांच्यात वाद झाला. या वादामुळे प्रियकर तरुणाने आपल्या प्रेयसीसमोर गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 26 वर्षीय प्रणय मोरे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे.

चौदा मैल परिसरात एका भाड्याच्या घरात राहणारा प्रणय जवळच्या उड्डाण कंपनीत कामाला होता. तर त्याची प्रेयसी गेले काही दिवस उत्तरप्रदेशात लखनौला गेली होती. ती तिथून परत आल्यानंतर 12 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी प्रणय आणि त्याची प्रेयसी दोघे चौदा मैल परिसरात प्रणय राहत असलेल्या भाड्याच्या घरात भेटले.

मात्र, दोघांमध्ये एकमेकांवरील संशयावरून तेव्हा जोरदार भांडण झाले. त्यावेळी प्रणयने प्रेयसीच्या इतरांशी बोलण्याबद्दल आक्षेप घेत राग व्यक्त केला. याच मुद्द्यावर दोघांचे बराच वेळ वाद झाले. त्यानंतर रागाच्या भरात अचानकच प्रणयने गळ्यात तारेचा फंदा टाकून गळफास घेतला.

त्याच्या प्रेयसीने त्याला वाचवण्याचे भरपूर प्रयत्न केले. मात्र, गळ्यात फास लावून पंख्याला लटकलेल्या प्रणयला उचलून धरण्यात ती अपयशी ठरली. यावेळी तिने शेजाऱ्यांना बोलावले, मात्र ते ही तिसऱ्या माळ्यावरील प्रणयच्या खोलीपर्यंत पोहोचेपर्यंत प्रणय निपचित झाला होता. शेजाऱ्यांच्या मदतीने प्रणयला सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्‍टर्सनी त्याला मृत घोषित केले.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.