परप्रांतीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

लोणावळा – येथील बॅटरीहिल, खंडाळा येथून जवळच असलेल्या मध्य रेल्वेच्या बोगद्याजवळ एक परप्रांतीय तरुण झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोपोली पोलीस रायगड यांनी पुणे ग्रामीण पोलीस कंट्रोलरूमला खबर देण्यात आली की, खंडाळा गावाच्या हद्दीमधून जाणाऱ्या रेल्वे लाईनवर बॅटरीहिलजवळ असलेल्या बोगद्याजवळ ज्या पायऱ्या आहेत. तेथे एक तरुण गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळून आला आहे.

या खबरीच्या आधारे घटनास्थळी पोचलेल्या लोणावळा पोलिसांना काळ्या रंगाचे जॅकेट आणि राखाडी रंगाची पॅन्ट परिधान केलेल्या तरुणाचा मृतदेह झाडावर गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आला. तरुणाची झडती घेतली असता त्याच्या खिशात आधारकार्ड आणि कल्याण जंक्‍शन ते अहमदाबाद जंक्‍शन प्रवासाचे रेल्वे तिकीट मिळाले.

आधार कार्डवरील माहितीनुसार या तरुणाचे नाव दिलीपकुमार वासुदेव राय (वय 34) असल्याचे आणि तो हाजीपुर वैशाली, बिहार येथील राहणार असल्याचे समजले.या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी आणि पोलीस हवालदार जे. जे. पाटणकर तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.