राहुरी – तालुक्यातील उंबरे येथील नवविवाहितेचा मृतदेह वांबोरी शिवारातील गडाख वस्ती येथील विहिरीमध्ये पाण्यावर तरंगताना आढळून आला. योगिता ऋषिकेश ढोकणे (रा. उंबरे) असे मयत विवाहितेचे नाव आहे. चारित्र्यावर संशय घेऊन पती व सासू यांनी शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबतची तक्रार मयत विवाहितेचे वडील रघुनाथ केशव दरेकर (रा.ताहराबाद, ता. राहुरी) यांनी वांबोरी दूरक्षेत्रात दिली आहे.
दरम्यान सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास उंबरे येथील आपल्या राहत्या घरातून बेपत्ता झालेली योगिता ढोकणे ही काल सायंकाळपर्यंत उंबरे-वांबोरी रस्त्यावर असलेल्या गडाख वस्ती परिसरातील रस्त्याच्या कडेला झाडांच्या सावलीत बसल्याचे परिसरातील काही नागरिकांनी बघितले असल्याचे समजते. त्यानंतर ही अनोळखी महिला कोणाची वाट पाहत असावी असे वाटल्याने तीच्याकडे कोणी लक्ष दिले नाही.
योगिताला बेपत्ता होऊन चोवीस तास उलटले तरीही ती मिळुन येत नसल्याने तिचा सर्वत्र शोध सुरू होता, त्यातच मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास सचिन अनिल गडाख हा आपल्या गट नं. 1060 यामधील शेतातील घासाला पाणी देण्यासाठी विहिरीवर गेला असता त्याला महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला.
त्याने तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व घटनेचा पंचनामा करून मृतदेह वर काढून उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला.
याप्रकरणी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले की, मागील वर्षभरापूर्वी 9 मे 2018 रोजी योगीता हीचा उंबरे येथील ऋषिकेश ढोकणे याच्याशी मोठ्या थाटामाटात विवाह संपन्न झाला. यानंतर आठ महिने योगिता हीला सासरी व्यवस्थित नांदवल्यानंतर नवरा ऋषिकेश व सासू संगीता हे तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ऋषिकेश याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश शिरसाठ करीत आहेत.