एका घटनेत माय-लेकीने तर दुसऱ्या घटनेत दाम्पत्याने संपविली जीवनयात्रा
नगर – नगर तालुक्यातील धनगरवाडी येथे माय-लेकीने तर भिंगारमध्ये पती-पत्नीने विहिरीत उडी मारून आपले जीवन संपविली. दोन घटनांत चौघांनी विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. दोन्ही घटनांतील आत्महत्येची कारणे समजू शकलेली नाही.
पहिल्या घटनेत नगर तालुक्यातील धनगरवाडी येथे माय-लेकीची विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना कशामुळे घडली. याबाबत अद्यापही काही समजले नाही.
नीता उर्फ कविता सचिन कापडे (वय- 27, रा. धनगरवाडी ता.नगर), व मुलगी प्रणाली सचिन कापडे (वय- 4) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी (दि.28) रात्री नीता कापडे व मुलगी प्रणाली यांनी स्वतःच्या घराला कडी लावून घराबाहेर पडल्या. सकाळी दोघी मायलेकी निदर्शनास आल्या नाही. त्यानंतर घरच्यांनी शोधाशोध केली असता, जवळच पाचशे मीटर अंतरावर असलेल्या एक विहिरीमध्ये दोघींचे मृतदेह आढळून आले. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शविच्छेदन तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस दीपक गांगर्डे हे करत आहेत. माय-लेकीने आत्महत्या का केली याचे अद्यापही कारण समजले नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दुसऱ्या घटनेत भिंगार येथे शेतातील विहिरीत उडी घेऊन पती-पत्नीने आपले जीवन संपविले आहे. ही घटना शुक्रवारी (दि.29) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बादल हरिचंद्र वाल्मिकी (वय-26), बबली बादल वाल्मिकी (वय- 19) असे या दांम्पत्याचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, वाल्मिकी दांम्पत्य हे भिंगार परिसरातील इंद्रनगर परिसरातील रहिवासी आहे. रविवार (दि.24) रात्री पासून हे दांम्पत्य गायब होते. त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत भिंगार पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. भिंगार येथे बुऱ्हानगर रोडवरील लष्करी हद्दीत असलेल्या एका शेतातील विहिरीत शुक्रवारी (दि.29) सकाळी कसला तरी वास येत असल्याचे तेथील सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आले. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले, तर त्यांना विहिरीत दोघांचे मृतदेह आढळून आले.
सुरक्षा रक्षकाने तातडीने याबाबतची माहिती भिंगार कॅम्प पोलीसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच भिंगार पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील हे सहकार्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले. भिंगार पोलीसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. दरम्यान दाम्पत्यांने आत्महत्या का केली? हे मात्र समजू शकले नाही. पोलीस या घटनेचा शोध घेत आहे.