सिमला- करोना विषाणूची लागण झाल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी वाळीत टाकलेल्या एका व्यक्तीने आज गळफास घेऊन आत्महत्या केली. हिमाचल प्रदेशमधील उना जिल्ह्यात ही घटना घडली. या व्यक्तीची करोनासाठीची टेस्ट “निगेटिव्ह’ आलेली होती. तरीही गावकऱ्यांनी त्याच्यावर सामुदायिक बहिष्कार घातला होता.
मोहम्मद दिलशाद असे या 37 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. उना जिल्ह्यातील बांगर गावातले रहिवासी होते. दिलशाद यांचा दिल्लीवरून परतलेल्या तबलिगी जमातच्या सदस्यांशी संपर्क होता. त्यामुळे दिलशाद यांनाही करोनाची लागण झाली असल्याचा संशय व्यक्त होत होता. याच संशयावरून दिलशाद यांना विलगीकरण केंद्रात नेऊन तपासणी करण्यात आली होती. तेथे त्यांची करोनाची टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर आरोग्य अधिकाऱ्यांनी त्याला गावात सोडले होते. मात्र सामाजिक बहिष्कार घातला गेल्याने त्यांनी आत्महत्या केली, असे पोलीस महासंचालक सीताराम मार्डी यांनी सांगितले.
दिलशाद यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला गेल्याचे आतापर्यंत तरी तपासात आढळलेले नाही. मात्र यासंदर्भात अधिक तपास केल्यावर सविस्तर माहिती देता येऊ शकेल, असेही मार्डी यांनी सांगितले.