उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
जळोची – बारामती शहरासह तालुक्यात “करोना’चा प्रसार रोखण्यासाठी करोना प्रतिबंधक उपाययोजना कडक राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विद्या प्रतिष्ठानच्या “व्हिआयटी’ सभागृहात आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, नगरपरिषद मुख्याधिकारी किरणराज यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, जिल्हा परिषदचे माजी बांधकाम सभापती संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, नगरसेवक सचिन सातव उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, करोनाचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. भविष्यात संसर्ग वाढू नये, यासाठी नागरिकांनी देखील अधिक दक्ष राहून गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल, याची काळजी घ्यावी. या कालावधीमध्ये येणारे सण, उत्सव साधेपणाने व गर्दी न करता साजरे करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.