निरंजनी आखाड्याच्या महंतांची स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या

आजराला कंटाळून आत्महत्या केल्याचा अंदाज

नवी दिल्ली : निरंजनी आखाड्याचे महंत आशिष गिरी यांनी रविवारी सकाळी पिस्तुलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी, पोलिस महासंचालक के पी सिंह, पोलिस अधीक्षक बृजेश श्रीवास्तव आणि न्याय वैद्यक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. महंत आशिष गिरी हे अनेक आजाराने ग्रस्त होते, त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

आखाडा परिषदेचे अध्यक्ष गिरी म्हणाले की, रविवारी सकाळी 8 वाजता माझे आशिष गिरींबरोबर बोलणे झाले होते. त्यांना नाश्‍ता करण्यासाठी मी मठात बोलावले होते. त्यावेळी आशिष गिरी यांनी आंघोळीनंतर येतो असा निरोप दिला. काही वेळानंतर ते न आल्यामुळे मठात राहणारे काही शिष्य त्यांच्या निवासस्थानी गेले. दुसऱ्या मजल्यावर त्यांचा दरवाजा उघडा दिसला. अंथरुणावर रक्ताच्या थारोळ्यात आशिष गिरी यांचा मृतदेह पडला होता. त्यांच्या हातात पिस्तुल होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आशिष गिरी हे उच्च रक्तदाब आणि पोटाच्या विकाराने त्रस्त होते. त्यांचे यकृतही खराब झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.