हैदराबाद – मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी घेतलेले बळी व सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी केलेली आत्मघातकी फलंदाजी असेच वर्णन या सामन्याचे करावे लागेल. आयपीएल स्पर्धेत मंगळवारी झालेला हा सामना मुंबईने अवघ्या 14 धावांनी जिंकला.
मुंबईने विजयासाठी दिलेल्या 193 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. त्यांचा भरात असलेला सलामीवीर हॅरी ब्रुक संघाच्या 11 धावा झालेल्या असताना 9 धावांवर परतला. त्यानंतर राहुल त्रिपाठीनेही निराशा केली. तो केवळ 7 धावांवर बाद झाला. या दोघांनाही जेसन बेहरेनड्रॉफने बाद केले. त्यानंतर मात्र, मंयक आग्रवालने कर्णधार एडन मार्करमच्या साथीत संघाचा डाव सावरताना अर्धशतक फलकावर लावले. या सामन्यात मंयकला धावा करणे अत्यंत गरजेचे होते.
दुसरीकडे मार्करमने विनाकारण फटकेबाजीचा प्रयत्न करताना आपली विकेट गमावली. तो 17 चेंडूत 1 चौकार व 1 षटकारासह 22 धावांवर परतला. फलंदाजीत चमक दाखवलेल्या मुंबईच्या कॅमेरुन ग्रीननेच त्याला बाद करत गोलंदाजीतही अफलातून कामगिरी केली. पाठोपाठ अभिषेक शर्माचा अडसर पियुष चावलाने दूर केला. यावेळी हैदराबादची स्थिती 4 बाद 72 अशी बनली होती. एका बाजूने आग्रवाल भक्कमपणे फलंदाजी करत होता. त्याला साथ देत हेनरीच क्लासेनने आश्वासक फलंदाजी केली. या जोडीने 13 व्या षटकांत संघाचे शतक फलकावर लावले. त्यांना 42 चेंडूत 87 धावांची आवश्यकता होती. यावेळी क्लासेनने चावल्याच्या गोलंदाजीवर दोन षटकार व एक चौकार फटकावला मात्र, त्याच षटकांत षटकार खेचण्याच्या प्रयत्नात 36 धावांवर बाद झाला. त्याने या खेळीत 16 चेंडूत 4 चौकार व 2 षटकार फटकावले. दुसरीकडे अर्धशतकाच्या जवळ आलेला आग्रवालही 48 धावांवर आनावश्यक फटका मारून बाद झाला. त्याने 41 चेंडूत 4 चौकार 1 षटकार मारला. टी. नटराजनच्या जागी अब्दुल समद इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीला आला. हैदराबादला विजयासाठी 30 चेंडूत 60 धावांची गरज होती. मार्को जेन्सननेही 3 चौकार फटकावत 13 धावा केल्या व विजयाच्या आशा निर्माण केल्या होत्या. मात्र, तो देखील आततायी फटका मारून बाद झाला. यावेळी समदला साथ देण्यासाठी आलेल्या वॉशिंग्टन सुंदरने चांगली खेळी केली मात्र, अनावश्यक धाव घेण्याच्या प्रयत्नात तो धावबाद झाला.
बेहेरनड्रॉफने नंतर मात्र दिशाहीन गोलंदाजी केली. यावेळी समदच्या साथीत भुवनेश्वर कुमार खेळत होता व त्यांना अखेरच्या षटकात विजयासाठी 20 धावांची गरज होती. कर्णधार रोहितने अखेरचे षटक अर्जुन तेंडुलकरच्या हाती सोपवले. या षटकात समद चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात 9 धावांवर धावबाद झाला. त्यानंतर अर्जुनने भूवनेश्वर कुमारला बाद करत हैदराबादचा डाव 178 धावांवर संपुष्टात आणला. मुंबईकडून बेहेरेनड्रॉफ, मेरेडीथ व चावला यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. ग्रीन व अर्जुनने 1 बळी घेतला.
तत्पूर्वी, कर्णधार रोहित शर्मा व ईशान किशन चांगल्या सुरुवातीनंतरही बाद झाल्यानंतर कॅमेरुन ग्रीनने नाबाद अर्धशतकी खेळी करत तिलक वर्माच्या साथीत मुंबई इंडियन्सला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 20 षटकांत 5 बाद 192 अशी मजल मारुन दिली.
हैदराबादचा कर्णधार एडन मार्करमने नाणेफेक जिंकत मुंबईला पहिल्यांदा फलंदाजी दिली. कर्णधार रोहितने ईशानच्या साथीत 41 धावांची सलामी दिली. सुरुवात चांगली झाल्यावरही रोहितने निराशा केली. तो 28 धावा करुन परतला. त्याने या खेळीत 18 चेंडूत 6 चौकार फटकावले. रोहित बाद झाल्यावर ईशानने कॅमेरुन ग्रीनच्या साथीत संघाचे अर्धशतक फलकावर लावले. ईशानही धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्याने 31 चेंडूत 3 चौकार व 2 षटकारांसह 38 धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादवने साफ निराशा केली.
त्यानंतर आलेल्या तिलक वर्माने ग्रीनला सुरेख साथ देत संघाचे शतक साकार केले. तर ग्रीनसह अर्धशतकी भागीदारी करताना संघाचे दीडशतकही पूर्ण केले. तिलकही आनावश्यकपणे फटका मारून बाद झाला. त्याने अवघ्या 17 चेंडूंचा सामना करताना 2 चौकार व 4 षटकारांसह 37 धावा केल्या. दरम्यान ग्रीनने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याला टीम डेव्हीडने साथ दिली. या जोडीने पाचव्या गड्यासाठी 41 धावांची भागीदारी करताना संघाला समाधानकारक मजल मारुन दिली. डेव्हीड 16 धावांवर धावबाद झाला. ग्रीन 40 चेंडूत 6 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 64 धावांवर नाबाद राहिला.
अर्जुन तेंडुलकरचा पहिला बळी
आयपीएल स्पर्धेतील आपला केवळ दुसराच सामना खेळत असलेल्या मुंबईच्या अर्जुन तेंडुलकरने भुवनेश्वर कुमारला कर्णधार रोहित शर्माकरवी झेलबाद केले व स्पर्धेच्या इतिहासातील आपला पहिलाच बळी मिळवला. यावेळी ड्रेसिंग रुममध्ये बसलेले त्याचे वडील व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. अर्जुनलाही आनंदाश्रु लपवता आले नाहीत.
लक्षवेधी
रोहितच्या आयपीएलमध्ये
6 हजार धावा पूर्ण
एडन मार्करमचे
सलग तीन झेल
रिचर्डसन, हार्दिक व
फाफ डुप्लेसीची बरोबरी
किशन, रोहितनंतर
ग्रीनने मुंबईला सावरले
कॅमेरून ग्रीनचे दमदार नाबाद अर्धशतक
टीम डेव्हीडचे
सामन्यात चार झेल
बेहेरेनड्रॉफ, मेरेडीथ व चावलाचे प्रत्येकी 2 बळी
संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स – 20 षटकांत 5 बाद 192 धावा. (रोहित शर्मा 28, तिलक वर्मा 37, ईशान किशन 38, टीम डेव्हीड 16, कॅमेरुन ग्रीन नाबाद 64, मार्को जेन्सन 2-43, भूवनेश्वर कुमार 1-31, टी. नटराजन 1-50). सनरायझर्स हैदराबाद – 19.5 षटकांत सर्वबाद 178 धावा. (मयंक आग्रवाल 48, हेनरीच क्लासेन 36, एडन मार्करम 22, रेले मेरेडीथ 2-33, जेसन बेहेरेनड्रॉफ 2-37, पियुष चावला 2-43, अर्जुन तेंडुलकर 1-18, कॅमेरुन ग्रीन 1-29).