बेरोजगारीला कंटाळून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे – बेरोजगारी तसेच कुटुंबियांशी होणाऱ्या भांडणाला कंटाळून तरुणाने भावाला व्हिडिओ कॉल लावून गळफास घेत आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. मात्र, भावाने शिवणे परिसरात नाकाबंदीवरील पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी धाव घेत दरवाजा तोडून तरुणाला खाली घेत प्राण वाचविले. दांगट इस्टेट भागात शनिवारी रात्री हा प्रकार घडला.

उत्तमनगर पोलीस ठाण्यातील पथक शिवणेतील शिंदे पूल येथे शनिवारी नाकाबंदी करीत होते. यावेळी रात्री एक तरुण धावत पोलिसांजवळ आला. त्याने त्याचा भाऊ राहत्या घरी आत्महत्या करीत असून गळफास घेत असल्याचा व्हॉट्‌स ऍपवरील व्हिडिओ दाखविला. तरुणाने पोलिसांना पत्ता सांगताच ते दांगट पाटील इस्टेटमधील स्नेहा अपार्टमेंटमध्ये दाखल झाले.

तरुणाला वाचविण्यासाठी पोलिसांसाठी एक एक क्षण महत्त्वाचा होता. त्यात लिफ्ट येण्यास उशीर होत होता. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, हवालदार दत्तराम भींडेकर, अजित शेंडगे यांनी पायऱ्यांनी धावत पाचवा मजला गाठला. त्यानंतर आवाज देऊनही दरवाजा न उघडल्याने त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केलाआणि तरुणास खाली घेत त्याचे प्राण वाचविले. दरम्यान, पोलिसांनी त्याला आत्महत्या करण्यामागचे कारण विचारले. त्यावेळी त्याने “मी बेरोजगार आहे, तसेच कुटुंबीयांशी भांडण होत असल्याने तेही मला सोडून गेले’, असल्याचे सांगितले. त्यामुळे जीवनाला कंटाळून आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्याने सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.