क्रेडाई पुणे मेट्रो अध्यक्षपदी सुहास मर्चंट

पुणे – प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुहास मर्चंट यांनी आज शनिवारी बांधकाम व्यावसायिकांसाठीच्या क्रेडाई पुणे मेट्रो अर्थात कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या पुणे शाखेच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. ही निवड 2019 ते 2021 या कालावधीसाठी आहे.

पुण्यात झालेल्या सोहळ्यात मर्चंट यांनी मावळते अध्यक्ष श्रीकांत परांजपे यांच्याकडून पदभार स्वीकारला. या वेळी क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर, उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया, क्रेडाई-महाराष्ट्रचे अध्यक्ष राजीव पारीख आणि क्रेडाईचे संस्थापक कुमार गेरा आणि रामकुमार राठी उपस्थित होते.

मर्चंट हे क्रेडाईचे सहसंस्थापक असून त्यांनी याआधी संस्थेचे मानद सचिवपद भूषवले आहे. मर्चंट यांच्याबरोबरच्या नवीन कार्यकारिणीत बांधकाम व्यावसायिक रोहित गेरा, अनिल फरांदे, रणजीत नाईकनवरे, किशोर पाटे, मनीष जैन आणि अमर मांजरेकर या सर्वांचा उपाध्यक्ष म्हणून समावेश आहे. कार्यकारिणीत आदित्य जावडेकर- सचिव, आय. पी. इनामदार- खजिनदार आणि अश्‍विन त्रिमल- सहसचिव आहेत.

क्रेडाई पुणे मेट्रो ही संस्था याआधी प्रमोटर्स अँड बिल्डर्स असोसिएशन ऑफ पुणे या नावाने ओळखली जात असे. 1987 पासून मर्चंट हे संस्थेशी निगडित आहेत. त्यांनी 1987 ते 1999 या कालावधीत संस्थेचे व्यवस्थापकीय समिती सदस्य म्हणून, तर 1999-2002 या कालावधीत मानद सचिव पद भूषविले. गेली 9 वर्षे त्यांनी क्रेडाई पुणे मेट्रोचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले.

मर्चंट यांच्याकडे बांधकाम क्षेत्रातील 45 वर्षांचा अनुभव आहे. केवळ बांधकामच नव्हे तर बांधकामाशी संलग्न असलेल्या आरसीसी डिझाईन, एस्टिमेशन, कच्च्या मालाची खरेदी, वास्तुस्थापत्य, व्यवस्थापन, विपणन, कायदेशीर बाबी आणि व्यवसायवृद्धी या विविध क्षेत्रांची त्यांना जाण आहे. सध्या ते कल्पतरू समूहाबरोबर कार्यरत आहेत. मर्चंट हे मूळचे अभियंता असून आयआयटी पवई येथून त्यांनी एम टेकचे शिक्षण पूर्ण केले. बुद्धिमान विद्यार्थी म्हणून वाखाणल्या गेलेल्या मर्चंट यांनी विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदकावरही आपले नाव कोरले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.