लहरी हवामानाच्या ‘ब्रेक’ नंतर भातशिवारात ‘सुगी’

शेतीवाडी : भाताच्या राशी भरण्यावर शेतकऱ्यांचा भर

लोणावळा – गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने अखेर विश्रांती घेतल्याने पावसामुळे संकटात सापडलेल्या मावळात भातपिकाला व निसर्गाच्या कोपामुळे सैरवैर झालेल्या शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे. मावळात भात कापणीसह भाताच्या पेंढ्या बांधणी, भात झोडपणे, मळणे, उफणणी व भाताच्या राशी पोत्यात भरण्याला वेग आला आहे. सर्वच स्तरातील शेतकरी युद्धपातळीवर शेतीच्या कामाला लागला आहे.

गेल्या काही वर्षांपासून मावळात ऐन भात कापणीच्या वेळी कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे तसेच भात पोटरीवर आल्यावर आणि तयार झालेल्या भातपिकाच्या दरम्यान पावसाच्या लपंडावामुळे मावळातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडत आहे. गतवर्षी ही ऐन भात कापणीच्यावेळी अवकाळी पावसामुळे भातपिक धोक्‍यात आले होते. त्यामुळे भातपिकाचे मोठे नुकसान झाले. गतवर्षी प्रमाणे यंदाही सोन्यासारखे आलेले भातपीक अनेक दिवसांपासून कोसळणाऱ्या अवकाळी पावसाच्या लहरीपणामुळे मोठ्या प्रमाणात वाया जाऊन शेतकऱ्यांच्या भातपिकासह मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

अखेर अनेक दिवसांपासून कोसळणाऱ्या अवकाळी पावसासह लहरी हवामानाने विश्रांती घेतल्याने उर्वरित तयार पिकावरील धोका संपला आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दसऱ्यापासूनच काही जातींचे तयार झालेल्या भाताची कापणी पावसामुळे अद्याप रखडली होती. दोन आठवड्यापूर्वीच मावळात कोकणी साळ, डोकी साळ, इंद्रायणी, पार्वती, चिमणसाळ, दोडकीसाळ या जातींचे भातपिक पूर्ण तयार झाल्याने शेतकरी कापणीच्या तयारीत होते. मात्र मागील दोन-तीन आठवडे राज्यात सुरू असलेल्या वादळी पाऊस व लहरी हवामानामुळे भातकापणी रखडली होती. अखेर गेल्या काही दिवसांपासून हवामानाने बदलामुळे भात कापणीला वेग आला आहे.

आंदर मावळात भात काढणी अंतिम टप्पात
टाकवे बुद्रुक – आंदर मावळात अतिवृष्टीमधून वाचावलेल्या भातपिकाची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. ज्या खाचरात पाणी नाही, त्याठिकाणचे पीक काढण्यावर शेतकरी भर देत असल्याचे दिसत आहे. नासाडी झालेल्या पीकाबाबत कोणतीही शाश्‍वती राहिली नसल्याने अतिवृष्टीच्या तडाख्यातून बचावलेल्या पीक शेतकरी काढून त्याच दिवशी घरी घेऊन येत आहे.

वातावरणातील सततच्या बदलमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आंदर मावळ परिसरातील टाकवे, फळणे, वडेश्‍वर, वाहनगाव, भोयरे, कशाळ या भागात इंद्रायणी व कोळंबा भाताचे पीक अधिक घेतले गेले. यंदा कोळबा पिकाला फटका बसला आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी नुसकान भरपाई मिळावी, यासाठी पीक विम्याचे फार्म भरुन दिले आहेत. अधिकारी वर्गाने पंचनामे केले आहे; परंतु अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याने शेतकऱ्यांकडून भरपाईची तात्काळ मिळावी, अशी मागणी होत

आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)