महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना

मुंबई, दि. 29 – राज्यात 30 एप्रिलपर्यंत लागू असलेला लॉकडाऊन पुढेही कायम राहणार आहे. 1 मेनंतर पुढील बहुतेक 15 दिवस लॉकडाऊन कायम राहणार आहे, असा निर्णय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. याच पार्श्‍वभूमीवर राज्यात यंदा महाराष्ट्र दिन गतवर्षीप्रमाणेच अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात यावा, अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेमार्फत करण्यात आल्या आहेत.

आपत्ती व्यवस्थापन विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, तसेच उपस्थितांसाठी मास्क बंधनकारक राहील, याचीही दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्हा मुख्यालयात केवळ एकाच ठिकाणी सकाळी 8 वाजता फक्‍तध्वजारोहण करण्यात यावे. विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी विभागीय आयुक्‍त पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक आणि अमरावती यांनी ध्वजारोहण समारंभाकरता योग्य ती व्यवस्था करावी. तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वजारोहणाचा वेगळा कार्यक्रम आयोजित करू नये. इतर सर्व जिल्ह्यांत केवळ जिल्हाधिकारी कार्यालय मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच सूचनांमध्ये सांगण्यात आलेल्या ठिकाणी केवळ पालकमंत्री, विभागीय आयुक्‍त मुख्यालय समारंभ असल्यास विभागीय आयुक्‍त, महापौर/नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी, ज्या ठिकाणी पोलीस आयुक्‍तालय आहे त्या ठिकाणचे पोलीस आयुक्‍त, महापालिका आयुक्‍त, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एवढ्याच पदाधिकारी/अधिकारी यांनी उपस्थित राहावे. इतर मान्यवरांना आमंत्रित करण्यात येऊ नये.

तसेच कवायती/संचलन आयोजन करण्यात येऊ नये, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
विधीमंडळ, उच्च न्यायालय आणि इतर संविधानिक कार्यालयांमध्ये कमीत कमी उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात यावे. ध्वजारोहण करणारे पालकमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित राहू न शकल्यास, विभागीय आयुक्‍त मुख्यालयी विभागीय आयुक्‍तांनी आणि जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी यांनी ध्वजारोहण करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.