भीमाशंकरकडून ऊस पीक स्पर्धेचे आयोजन

मंचर / पारगाव शिंगवे-आंबेगाव तालुक्‍यातील पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याकडून गाळप हंगाम 2019-20 साठी हंगामनिहाय, एका नावाने व एकरी जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ऊस पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

कारखाना कार्यक्षेत्र व परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये ऊस उत्पादन वाढीस प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील ऊस उत्पादकता वाढ योजनेअंतर्गत ऊस पीक स्पर्धा घेतली जाते. योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून नाममात्र प्रवेश शुल्क शंभर रूपये घेण्यात येते.

स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2019 आहे. स्पर्धेमध्ये हंगामनिहाय आडसाली, पूर्वहंगामी, सुरु व खोडवा प्रकारातील ऊसाचे जास्तीत जास्त उत्पादन घेणाऱ्या व संपूर्ण हंगामात एका नावावर जास्तीत जास्त ऊस गाळपास देणाऱ्या शेतकऱ्यांना प्रथम क्रमांकास 25 हजार, द्वितीय क्रमांक- 15हजार, तृतीय क्रमांक-10 हजार रूपये तसेच प्रती एकरी 120 मेट्रीक टनाच्या पुढे ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना 25 हजार रूपये व 100 मेट्रीक टनाच्या पुढे ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना 10 हजार रुपये, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येते. ऊस पीक स्पर्धेत भाग घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी कारखान्यांचे विभागीय शेतकी कार्यालयांशी संपर्क साधावा असे आवाहन कारखान्यामार्फत करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.