साखर आरोग्यास धोकादायक

– साखरेच्या पॅकेटवर लिहिणार धोक्‍याचा इशारा

मुंबई  –
साखरेचे खाणार त्याला डायबिटीज होणार… अशी एक प्रचलित म्हण आहे. होय, पण ही म्हण आता सत्यात उतरणार आहे. महाराष्ट्रात डायबिटिजच्या रूग्णांचे वाढते प्रमाण पाहता साखरेला धोकदायक ठरवले जाणार आहे. त्यानुसार यापुढे बाजारात येणाऱ्या साखरेच्या पॅकेटवर साखर आरोग्यास धोकादायक असा धोक्‍याचा इशारा लिहिला जाणार आहे, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

राज्यात डायबिटीज रुग्णांची संख्या वाढत असून या आजाराला रोखण्यासाठी अजून औषध बाजारात आलेले नाही. हा आजार झालेल्या रूग्णांना अनेक पथ्य पाळावी लागतात. त्यामुळे धकाधकीच्या जीवनात लोकांची जीवनशैलीच बदलून जाते. या आजाराला वैंटाळून नागरिक आत्महत्याही करतात. ही वस्तूस्थिती माहीत असतानाही लाखो लोकांकडून साखरेच्या गोड वस्तू खाण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. सिगारेट, गुटखा आदी तंबाखूजन्य पदार्थांच्या पॅकेटवर आरोग्यास धोकादायक असा इशारा दिलेला असतो.

नेमक्‍या त्याच पार्श्‍वभूमिवर डायबिटीज आजाराला अटकाव करण्यासाठी अन्न व औषधे मानदे प्राधिकरणांकडून साखर कार्यालयाला साखरेच्या पॅकेटवर साखर आरोग्यास धोकादायक असा इशारा लिहिण्याची शिफारस केली आहे. ही शिफारस लवकरच अमलात येणार असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. त्यामुळे भविष्यात साखर खाण्याचे प्रमाण देखील नियंत्रित होणार असल्याची शक्‍यता आहे.

दरडोई साखर खाण्याचे प्रमाण झाले कमी
डायबिटीज रूग्णांमुळे राज्यात साखर खाण्याचे प्रमाण कमी झाल्याचे एका आरोग्य विषयक सर्वेक्षणात आढळून आले आहे. डायबिटीजमुळे माणसी ग्रॅम साखर कमी झाल्याचा दावा या सर्वेक्षणात करण्यात आल्याची माहिती गायकवाड यांनी दिली. आरोग्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्याने साखरेच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात घट होत असल्याचे यावेळी गायकवाड यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.