दिवाळी आली तरी साखर कारखाने बंद

विधानसभा निवडणुकीमुळे जिल्ह्यात गाळप हंगाम नोव्हेंबरमध्ये

भवानीनगर – जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम असल्यामुळे बहुतांशी साखर कारखान्यांचे संचालक मंडळ निवडणूक प्रक्रियेत व्यस्त आहे. सोमवारी (दि.21) मतदान आणि गुरूवारी (दि.24) निकाल लागणार आहे. राज्यात कोणाची सत्ता येणार. याकडे साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे. कारण, साखर उद्योगा संदर्भातील अनेक निर्णय नव्या सरकारवर अवलंबून असणार आहेत.

जिल्ह्यात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सप्टेंबर महिन्याच्या मध्यास किंवा अखेरीस सुरू होतो. ऑक्‍टोंबरच्या पहिल्या आठवड्यात कारखान्यांची धुराडी धगधगत असतात. परंतु, विधानसभा निवडणुकीमुळे साखर कारखान्यांनी गळीत हंगाम लांबणीवर टाकला आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हंगाम सुरू होण्याची शक्‍यता आहे.

जिल्ह्यातील कारखान्यांत गळीत हंगाम सप्टेंबरमध्ये होत असतो, यामुळे ऊसतोड मजुरांच्या टोळ्यांची पालही याच दरम्यान कारखाना परिसरात पडत असतात. परंतु, यावेळी ऊसतोड मजुरच विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराकरिता मजुरीवर फिरत आहेत. तसेच, त्यांच्याच गावात मतदान असल्याने कुठल्याचा कारखान्यांनी अशा टोळ्यांबरोबर अद्याप करार केलेला नाही. त्यातच दिवाळी सण तोंडावर असल्यानेही या कामगारांनी आपापली गावे सोडलेली नाहीत. यापार्श्‍वभुमीवर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना गळीत हंगाम नवे सरकार आल्यावर आणि दिवाळी गोड झाल्यानंतरच सुरू होईल, अशी चिन्हे आहेत.

दरम्यान, साखर कारखाने गेल्या गळीत हंगामात कार्यक्षेत्रातील उसाचे संपूर्ण गाळप करण्यात यशस्वी ठरले आहेत. यावेळी परिस्थिती वेगळी आहे. गळीत उशीरा सुरू होत असल्याने कारखान्यांपुढे संपूर्ण ऊस गळिताचे आव्हान असणार आहे. यावर्षी उसाची लागवड कमी झाल्याने ऊस मिळवण्याकरीताही कारखान्यांना पळापळ करावी लागणार आहे. याच पार्श्‍वभुमीवर जिल्ह्यातील बहुतांशी कारखाने किमान बॉयलर अग्नीप्रदिपनाचे कार्यक्रम दिवाळी दरम्यान घेण्याच्या तयारीत आहेत.

गळित परवाना मागणी केलेले कारखाने…
सोमेश्‍वर सहकारी (गाळप क्षमता प्रतिदिन-5000 मेट्रीक टन), माळेगाव सहकारी (5000 मेट्रीक टन), छत्रपती सहकारी (3,500 मेट्रीक टन), विघ्नहर सहकारी (5000 मेट्रीक टन), संत तुकाराम सहकारी (2,500 मेट्रीक टन), भीमाशंकर सहकारी (2,500 मेट्रीक टन), घोडगंगा सहकारी (5000 मेट्रीक टन), नीराभीमा सहकारी (5000 मेट्रीक टन), कर्मयोगी सहकारी (5000 मेट्रीक टन), भीमापाटस सहकारी (5000 मेट्रीक टन), दौंड शुगर प्रा.लि. (2,500 मेट्रीक टन), अनुराज शुगर (2,500 मेट्रीक टन), श्रीनाथ म्हस्कोबा (3,500 मेट्रीक टन) या सहकारी आणि खासगी कारखान्यांनी गळीताचा परवाना साखर आयुक्तांकडे मागितला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)