पिंपरी – पत्नी आणि सासू-सासरे यांच्या त्रासाला कंटाळून एका युवकाने बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी अखेर पत्नी, सासू आणि सासरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयूर वचकल असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी ज्ञानेश्वर गंगाराम वचकल (वय 67, रा. तळेगाव दाभाडे) यांनी पोलिसात तक्रार दिली असून मयूर यांची पत्नी प्रतीक्षा मयूर वचकल, गोरख विठ्ठल खेतामाळीस (रा. श्रीगोंदा, अहमदनगर) आणि सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर यांची पत्नी प्रतीक्षा आणि तिचे आई-वडील यांनी मयूर यांना वारंवार त्रास देत होते. हा प्रकार 26 जुलै 2016 ते 31 मार्च 2019 या कालावधीत सातत्याने मयूर पत्नी आणि सासू-सासऱ्यांचा त्रास सहन करत होता.
या त्रासाला कंटाळून मयूर यांनी 31 मार्च रोजी तळेगाव दाभाडे येथील पुणे-मुंबई महामार्गाजवळ एका बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत त्यांच्या वडिलांनी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार मयूर यांची पत्नी आणि तिचे आई-वडील यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.