इस्माइलिया (इजिप्त), दि. 25 – सुएझ कालव्यामध्ये विशालकाय मालवाहू जहाज अडकून पडल्यामुळे या सागरी मार्गातील वाहतुक पूर्णपणे खोळंबली आहे. अजूनही हे जहाज सरळ करून मार्गस्थ करण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ शकलेले नाहीत. सुएझ कालव्यातून जाणाऱ्या सुमारे 150 जहाज, लहानमोठ्या बोटींचा रस्ता या जहाजामुळे अडवला गेला आहे. त्यामुळे ही जहाजे मार्ग मिळण्याच्या प्रतिक्षेत असल्याचे अधिकाऱ्यांनी संगितले.
“द एव्हर गीव्हन’नावाचे जहाज आशिया खंडातून युरोप खंडात जात असताना मंगळवारी या कालव्यामध्ये अडकून पडले आहे. हे जहाज वाळूत रुतून पडले असल्याने तिरके झाले आहे. आता हे जहाज सरळ करण्यासाठी अवजड ड्रेजर्सचा वापर केला जाऊ लगला आहे. तसेच भरती आल्यामुळे हे जहाज वर उचलले जाण्याचीही शक्यता आहे.
या जहाजावरील सर्व 25 कर्मचारी सुरक्षित आहेत, असे बर्नार्ड स्च्युलेट शीप मॅनेजमेंट कंपनीने म्हटले आहे. लाल समुद्रातून कालव्यात प्रवेश करताच कधी नव्हे एवढा वारा सुटला होता पण त्यामुळे आतापर्यंत एकही कंटेनर बुडला नव्हता, असे या जहाजाचे व्यवस्थापन बघणाऱ्या एव्हरग्रीन मरीन कॉर्प या कंपनीने म्हटले आहे. या जहाजाच्या अडथळ्यामुळे सागरी वाहतुक खंडीत झाल्याबद्दल जहाज मालकाने दिलगिरी व्यक्त केली आहे.