“त्या’ कंपन्यांवर गुन्हे दाखल करा

ऑनलाईन औषध विक्री ः अन्न व औषध प्रशासनाकडे मागणी

पिंपरी – कोणतेही प्रिस्क्रिप्शन नसताना गर्भपाताची औषधे देवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या तसेच वारंवार सूचना देवूनही अशा प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या ऑनलाईन शॉपिंग साईट आणि अन्य संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष विवेक तापकीर यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष विवेक तापकीर यांनी याबाबत पुणे येथील अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ऍमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग साईटवरून गर्भपाताची औषधे (अनवॉन्टेड किट) सहज उपलब्ध होत आहेत. त्यासोबत कोणतेही प्रिस्क्रिप्शन देण्यात येत नाही. ही औषधे वापरणाऱ्यांच्या शरिरावर दूरगामी दुष्परिणामाची भीती आहे. याबाबत पडताळणी करून गर्भपाताची औषधे ऑनलाईन माध्यमातून विक्री करणाऱ्या दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

गर्भपात करणे हे कायद्याने गुन्हा आहे. नोंदणीकृत डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय तसेच त्यांच्या चिठ्ठीशिवाय गर्भपाताची औषधे मिळत नाहीत. नोंदणीकृत डॉक्‍टरांनी चिठ्ठी दिली तरी त्या चिठ्ठीची एक प्रत औषध विक्रेत्याकडे ठेवली जाते. ग्राहकास दिल्या जाणाऱ्या दुसऱ्या प्रतीवर औषधाची पूर्ण माहिती लिहून त्यावर दुकानदाराचा सही-शिक्का दिला जातो. ही जीवघेणी औषधे जाहिरात करून विकली जात आहेत. कायद्याचे बंधन ऑनलाईन औषधे विक्रेत्यांकडून पाळले जात नसल्याचा आरोप तापकीर यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)