Sudhir Salvi। राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून आपापल्या मतदारसंघात उमेदवारांची घोषणा करण्यात येत आहे. मात्र काही ठिकाणी इच्छुकांची नाराजी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. असाच एक मतदारसंघ म्हणजे शिवडी विधानसभा मतदारसंघ. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांना ठाकरे गटाकडून शिवडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यांच्याऐवजी शिवडी विधानसभा मतदारसंघातून अजय चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली होती. यानंतर सुधीर साळवी यांनी शुक्रवारी संध्याकाळी लालबागमध्ये आपल्या समर्थकांचा मेळावा आयोजित केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात मोठ्या घडामोडी घडणार असल्याचे दिसून येत आहे.
शिवडी विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकणार Sudhir Salvi।
शिवडी मतदारसंघात सुधीर साळवी यांना उमेदवारी देण्यात आली नाही त्यानंतर आता आपण त्यांची भेट घेणार असल्याचे अजय चौधरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले आहे. याविषयी बोलताना,”सुधीर साळवी हे अनेक वर्षे शिवसेनेत काम करत आहेत. त्यामुळे उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांची नाराजी असू शकते. पण पक्षश्रेष्ठी, स्थानिक नेतृत्व त्यांची समजूत काढेल, असे मला ठामपणे वाटते. मी त्यांना जरुर भेटेन. आमच्यात काही वैर किंवा वितुष्ट नाही. राजकारणात काम करताना प्रत्येकाला वाटतं निवडणूक लढायला मिळाली पाहिजे. निवडणूक लढण्याची इच्छा हा काही गुन्हा नाही. शिवडी विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकणार,”असे अजय चौधरी यांनी म्हटले. मात्र, आता लालबाग मार्केटमधील आजच्या मेळाव्यात सुधीर साळवी काय बोलणार,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लालबाग मार्केटमध्ये सुधीर साळवींचा मेळावा Sudhir Salvi।
सुधीर साळवी यांनी गेल्या वर्षभरापासून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न सुरु केले होते. मध्यंतरी गणेशोत्सवाच्या काळात लालबागचा राजाच्या पायाशी सुधीर साळवी यांच्या नावाने भावी आमदार अशी चिठ्ठी ठेवण्यात आली होती. ही चिठ्ठी प्रचंड व्हायरल झाली होती. त्यामुळे शिवडी विधानसभेच्या उमेदवारीसाठी सुधीर साळवी यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. शिवडातील शिवसेनेचे शाखाप्रमुख आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही सुधीर साळवी यांना पाठिंबा दिला होता. मात्र, निष्ठेच्या बळावर अजय चौधरी हे मातोश्रीकडून पुन्हा शिवडीची उमेदवारी पदरी पाडून घेण्यात यशस्वी ठरले होते. सुधीर साळवी यांनी वेगळी राजकीय वाट निवडल्यास शिवडीत अजय चौधरी यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.