मुंबई – राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तिसऱ्या दिवशी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्यात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. विरोधीपक्ष भाजपकडून राज्यातील विविध मुद्दांवर सरकारवर कडाडून टीका करण्यात आली. अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांपासून भाजपाच्या सर्वच नेत्यांनी सरकारला धारेवर धरले. विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खास ठाकरे शैलीत विरोधकांचा समाचार घेतला.
बुधवारी भाजपनेते सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढविताना राज्यात राष्ट्रपती राजवट आणण्याची वेळ आली असल्याचे वक्तव्य केले होते. तसेच जळगाव वसतिगृह प्रकरणावरुन संताप व्यक्त करताना मुनगंटीवार यांनी राज्य सरकार काहीच कारवाई करत नसल्याची टीका केली होती. मुनगंटीवार यांच्या भाषणाची उद्धव ठाकरे यांनी फिरकी घेत मुनगंटीवार यांचे भाषण पाहताना ‘नटसम्राट’ पाहात असल्याचा भास झाला, अशी कोपरखळी उद्धव ठाकरे यांनी लगावली.
मी माझ्या केबिनमध्ये बसलो होतो. कामकाज ऐकताना अचानक मला भास झाला की मी ‘नटसम्राट’ बघतोय. मी अथेल्लो, मी हॅम्लेट…आणि शेवट असा केविलवाणा वाटला की कोणी किंमत देता का किंमत, अस म्हणत मुख्यमंत्र्यांनी मुनगंटीवार यांच्या भाषणाचा समाचार घेतला. सुधीरभाऊ काय तुमचा वेश, काय तुमचा आवेश… देवेंद्रजींना भिती वाटायला लागली की आमचं कसं होणार ? कारण ज्या तडफेने तुम्ही बोलत होता, ते छान होतं, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.