Sudeshna Shiwankar : सातारच्या सुदेष्णाची सुवर्णझेप! सातासमुद्रापार फडकावला भारताचा झेंडा
Sudeshna Shiwankar : तैवानमधील न्यू तैपेई सिटी येथे सुरू असलेल्या प्रतिष्ठित 'जागतिक ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर' (World Athletics Continental Tour) स्पर्धेत भारतीय महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

Sudeshna Shiwankar : तैवानमधील न्यू तैपेई सिटी येथे सुरू असलेल्या प्रतिष्ठित ‘जागतिक ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर’ (World Athletics Continental Tour) स्पर्धेत भारतीय महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. महिलांच्या ४ बाय १०० मीटर रिले (4x100m Relay) स्पर्धेत भारतीय संघाने सुवर्णपदकाला गवसणी घातली.
या सुवर्णविजेत्या संघात साताऱ्याची अव्वल धावपटू सुदेष्णा शिवणकर (Sudeshna Shivankar) हिने आपल्या उत्कृष्ट आणि वेगवान कामगिरीच्या जोरावर जागतिक स्तरावर देशाचा आणि साताऱ्याचा ठसा उमटवला आहे.
स्पर्धेच्या विक्रमाची बरोबरी!
तैवानमधील बानकियाओ स्टेडियमवर शनिवारी हा थरारक सामना पार पडला. भारतीय संघाने ही रिले शर्यत अवघ्या ४४.०७ सेकंदांत पूर्ण करत अव्वल स्थान पटकाविले. विशेष म्हणजे, भारतीय महिला संघाने ही वेळ नोंदवत थेट या स्पर्धेच्या जुन्या विक्रमाची बरोबरी साधली आहे. भारतीय संघाने दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या व्हिएतनामच्या संघावर ०.३१ सेकंदांच्या मोठ्या फरकाने मात करत सुवर्णपदक आपल्या नावावर केले.
‘या’ चौकडीने रचला इतिहास
भारतीय संघात साताऱ्याच्या सुदेष्णा शिवणकर (Sudeshna Shivankar) व्यतिरिक्त एस. एस. स्नेहा, श्रावणी नंदा आणि तमन्ना या महिला धावपटूंचा समावेश होता. या चारही खेळाडूंनी मैदानात जबरदस्त ताळमेळ आणि वेग दाखवत भारताला हे सुवर्ण यश मिळवून दिले.
खर्शी गाव ते आंतरराष्ट्रीय मैदान: सुदेष्णाचा सुवर्ण प्रवास
सुदेष्णा शिवणकरचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. साताऱ्यातील जावळी तालुक्यातील ‘खर्शी’ या छोट्याशा गावातून तिने आपल्या धावण्याचा प्रवास सुरू केला.सुदेष्णाने आजवर राष्ट्रीय पातळीवर ६४, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर ३ पदके मिळवून आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली आहे.
‘खेलो इंडिया’ (Khelo India) स्पर्धेत सलग ६ वर्षे सुवर्णपदक जिंकणारी सुदेष्णा (Sudeshna Shivankar) ही देशातील एकमेव खेळाडू ठरली आहे. गेली ८ वर्षे ती राष्ट्रीय प्रशिक्षक बळवंत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत कठीण आणि अथक मेहनत घेऊन सराव करत आहे. तिच्या या कष्टाचे फळ आज जागतिक पातळीवर सुवर्णपदकाच्या रूपाने पाहायला मिळत आहे.






