परवानगीपेक्षा जास्त व्यक्ती असल्यास कारवाई
पुणे – ग्रामीण भागात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभ होण्याच्या ठिकाणी पोलिसांनी अचानक पाहणी करून करोनाविषयक सूचनांचे पालन होते की नाही, याची तपासणी करावी. परवानगीपेक्षा जास्त व्यक्ती असल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.
करोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी यांनी गुरुवारी याबाबतची आढावा बैठक घेतली. यावेळी आरोग्य विभाग, पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ग्रामीण भागात करोनाचे रुग्ण वाढत असलेली ठिकाणे शोधा, एका करोनाच्या रुग्णामागे 20 व्यक्तींची तपासणी करण्यात यावी. ग्रामीण भागात करोनाच्या चाचण्यांची संख्या वाढवा. तसेच कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.