नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी 13-15 जुलै दरम्यान फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिरातीच्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. 14 जुलै रोजी फ्रान्सच्या बॅस्टिल डे परेडमध्ये पंतप्रधान मोदी हे सन्माननीय पाहुणे असतील, जिथे भारतीय सशस्त्र दलांच्या तुकड्याही सहभागी होणार आहेत.
13-14 जुलै दरम्यानच्या फ्रान्स दौऱ्यात पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी औपचारिक चर्चा करतील. राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन भारतीय पंतप्रधानांच्या सन्मानार्थ मेजवानी तसेच खाजगी डिनरचे आयोजन करतील.
पंतप्रधान फ्रान्सचे पंतप्रधान, सिनेटचे अध्यक्ष यांचीही ते भेट घेणार असून फ्रान्सच्या नॅशनल असेंब्लीलाहीं ते भेट देणार आहेत. ते स्वतंत्रपणे फ्रान्समधील भारतीय नागरीक, भारतीय आणि फ्रेंच कंपन्यांचे सीईओ आणि प्रमुख फ्रेंच व्यक्तींशी संवाद साधतील. यावर्षी भारतफ्रान्स धोरणात्मक भागीदारीचा 25 वा वर्धापन दिन आहे.
फ्रान्सच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान 15 जुलै रोजी अबुधाबीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. निवेदनानुसार पंतप्रधान यूएईचे अध्यक्ष आणि अबू धाबीचे शासक शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी चर्चा करतील.