अशी असेल पुण्यातील मानाच्या गणपतींची मिरवणूक

पुणे: शहरातील बाप्पांच्या मिरवणुका आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचल्या आहेत. पुण्याच्या गणेशोत्सवात मानाच्या पाच गणपतींची मिरवणुकीचे गणेशभक्तांना विशेष आकर्षण असते. देश-विदेशातून लाखो गणेशभक्त विसर्जन मिरवणुकीसाठी पुण्यात दाखल होतात. मानाच्या पाचही गणपतींच्या मिरवणुकीला सकाळी 10 वाजता सुरूवात होते. या मिरवणुकीची रुपरेषा मंडळांनी जाहीर केली असून ती पुढीलप्रमाणे.


श्री कसबा गणपती

बेलबाग चौक येथून सकाळी 11.15 वाजता मुख्य मिरवणुकीला सुरूवात होईल. या विसर्जन मिरवणुकीत रमणबाग प्रशाला, रूद्रगर्जना आणि कलावंत ढोलताशा पथके सहभागी होणार आहेत. ही मिरवणूक दुपारी 3.15 वाजता टिळक चौकात पोहोचेल. नगारखाना, आर्ट ऑफ लिव्हींग, प्रभात ब्रॅंड, कामयानी प्रशाला, बॅंक ऑफ इंडिया, मुलींचे रोप मल्लखांब पथक आणि रोटरी क्‍लबची गट सहभागी होणार आहेत, अशी माहिती श्रीकांत शेटे यांनी दिली.


श्री तांबडी जोगेश्‍वरी गणपती

सकाळी 9 वाजता जोगेश्‍वरी चौकातील मांडवांतून “श्रीं’चे पालखीत विराजमान होऊन प्रस्थान करणार आहेत. अब्दागिरी, मानचिन्हे आणि चांदीच्या पालखीत बाप्पा विराजमान होणार आहेत. मिरवणुकीत सतीश आढाव यांचे नगारावादन होईल. न्यू गंधर्व ब्रास बॅन्ड, समर्थ प्रतिष्ठान, शिवमुद्रा, ताल या पथकांचे ढोल ताशा वादन होणार आहे. तर विष्णूनादचे कार्यकर्ते पालखी पुढे शंख नाद करणार आहेत. यांसह पारंपरिक वेशात अश्‍वारुढ कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी होणार आहेत, अशी माहिती राजाभाऊ टिकार यांनी दिली.


श्री गुरूजी तालीम गणपती

“श्रीं’च्या मिरवणुकीत जयंत नगरकर यांचे नगारा वादन, अश्‍वराज बॅन्ड, नादब्रह्म, गर्जना या पथकांचे वादन होणार आहे. “श्रीं’च्या मिरवणुकीसाठी सुभाष आणि सुनील सरपाले यांनी फुलांचा “हरे कृष्णा’ रथ साकारला आहे, अशी माहिती पृथ्वीराज परदेशी यांनी दिली.


श्री तुळशीबाग गणपती

मिरवणुकीत लोणकर यांचे नगारावादन होणार आहे. तर स्वरूपवर्धिनी, गजलक्ष्मी, हिंद तरूण मंडळ या ढोल-ताशा पथकांचे वादन होणार आहे. 22 फूट उंचीच्या फुलांनी सजविलेल्या “मयुरासना’वर “गणराय’ विराजमान होणार आहेत, अशी माहिती विवेक खटावकर यांनी दिली.


केसरीवाडा गणपती

“श्रीं’ची मूर्ती फुलांनी सजविलेल्या पालखीत विराजमान होणार आहे. या मिरवणुकीत बिडवे यांचे नगारावादन होणार आहे. तर श्रीराम आणि शिवमुद्रा या पथकांचे ढोलताशा वादन होणार आहे. यावेळी इतिहास प्रेमी मंडळ जिवंत देखावा सादर करणार आहेत. या मिरवणुकीमध्ये केसरी-मराठा ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती डॉ. रोहित टिळक यांनी दिली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×