नवी दिल्ली – १८ व्या लोकसभेचे पहिले सत्र आजपासून सुरू झाले. नव्याने निवडून आलेल्या खासदारांना आज सदस्यत्वाची शपथ देण्यात आली. शपथ घेताना खासदार आपापल्या राज्याची ओळख दर्शवणारी वेषभुषा करून आले होतेच आणि त्यांनी वेगवेगळ्या भाषांमध्येही शपथ घेतली.
एकप्रकारे भारताच्या विविध परंपरांचे आणि देशात असलेल्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचेच दर्शन सभागृहात झाले. संस्कृत, डोगरी, बंगाली, आसामी आणि उडिया अशा आपल्या मातृभाषेतून सदस्यांनी शपथ घेतली. पहिल्या सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहाचे सदस्य म्हणून शपथ घेतली. प्रोटेम स्पीकर भर्तृहरी महताब यांनी त्यांना शपथ दिली.
त्यांनी हिंदीतून शपथ घेतली व त्यावेळी सभागृहात जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, अन्नपूर्णा देवी, ज्योतिरादित्य सिंधिया आदी मंत्र्यांनीही हिंदीत शपथ घेतली.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी उडिया या त्यांच्या मायबोलीतून शपथ घेतली. त्यांच्या शपथविधीच्या वेळीच विरोधी पक्षांकडून नीट घोटाळ्याचा उल्लेख करत घोषणाबाजी करण्यात आली. केरळमधून विजयी झालेले भारतीय जनता पार्टीचे एकमेव खासदार सुरेश गोपी यांनी मल्याळी भाषेत शपथ घेत भारतीय भाषांचे वैविध्य अधोरेखित केले.
गोव्याचे श्रीपाद येसो नाईक यांनी संस्कृत तर सुकांत मुजूमदार यांनी बांगला भाषेतून शपथ घेतली. पुण्याचे खासदार व केंद्रीय मंत्री मुरली मोहोळ यांनी मराठीतून शपथ घेतली. जितेंद्र सिंह यांनी डोगरी, सर्वानंद सोनोवाल यांनी आसामी तर राममोहन नायडू यांनी तेलगुतून शपथ घेतली.
सभागृहात झळकल्या संविधानाच्या प्रती
पंतप्रधानांचे नाव जेंव्हा शपथ घेण्यासाठी पुकारले गेले तेंव्हा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हातात संविधानाची लाल रंगाची एक छोटी प्रत दिसून आली. मोदी यांची शपथ सुरू असताना राहुल आणि अन्य विरोधी नेत्यांनी संविधानाची प्रत झळकवली. विरोधी पक्षांनी कामकाजात सहभागी होण्याच्या अगोदर सभागृहाच्या बाहेरही निदर्शने केली. मोदी शपथ घेण्यासाठी जात असताना राहुल यांनी त्यांना संविधानाची प्रत दाखवली.
अशी आहे आसन व्यवस्था
राहुल गांधी, तृणमूल कॉंग्रेसचे नेते कल्याण बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे नेतेअखिलेश यादव आणि अवधेश प्रसाद सिंह विरोधी पक्षांच्या विरोधकांच्या बाजूला पहिल्या रांगेत बसले होते. भाजप खासदार आणि हिमाचल प्रदेशातील मंडी येथील प्रतिनिधी कंगना रणावत आठव्या रांगेत तर रामायण मालिकेत रामाची भूमिका साकारणारे अरूण गोविल नवव्या रांगेत बसले होते. भाजपचे नेते आणि लोकसभेचे माजी सभापती ओम बिर्ला यांना तिसऱ्या रांगेत स्थान मिळाले.