शिक्षण विभागाचा असाही कारभार; पदोन्नतीचा अजब फंडा

शालेय शिक्षणमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची ओळखपरेड; जाणून घेतला कल

– डॉ. राजू गुरव

पुणे – राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागातील शिक्षण उपसंचालकांची 26 पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. यातील 16 पदे पदोन्नतीने भरण्यासाठी मागील दीड वर्षात अधिकाऱ्यांकडून चारवेळा महसूली विभागाची पसंती मागविली. त्यानंतर आता थेट शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अधिकाऱ्यांची ओळखपरेड घेत खास मुलाखतीच घेतल्या. हा पदोन्नतीचा अजब फंडाच म्हणावा लागणार आहे. यावेळी प्रत्येक अधिकाऱ्यांनी “मीच लय भारी’ असल्याचे दाखवून देण्याचा जोरदार प्रयत्नही केला.

राज्यात विविध ठिकाणी शिक्षण उपसंचालकांची 35 पदे मंजूर असून त्यामधील केवळ 9 पदेच भरण्यात आलेली आहेत. पुण्यात 15, नागपूर मध्ये 1, औरंगाबादमध्ये 4, कोकणात 5, नाशिकमध्ये 1 अशी पदे रिक्तच पडली आहेत. या रिक्त पदांचा कार्यभार इतर अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आलेला आहे. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या डोकेदुखीत वाढ झालेली आहे.

शासनाकडून खुल्या प्रवर्गातून पदोन्नत्यांसाठी पात्र अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात आली. ही यादीही एक-दोन वेळा बदलण्यातही आली. यात औदुंबर उकिरडे, सुधाकर तेलंग, सुभाष बोरसे, हारुन आत्तार, वंदना वाहूळ, राजेश क्षीरसागर, अर्जना कुलकर्णी, संदीप संगवे, राजेंद्र अहिरे, वैशाली जामदार, श्रीराम पानझाडे, शैलजा दराडे, अनिल साबळे, रमाकांत काठमोरे, डॉ. गणपत मोरे, शिवलिंग पटवे या अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळणार आहे. कोणत्या महसूली विभागात काम करायचे आहे याच्या पसंती किंवा विकल्प अधिकाऱ्यांनी नोंदविल्या आहेत.

पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या सर्व 16 अधिकाऱ्यांना नुकतेच मुंबईला बोलाविण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी आपआपल्या कार्याच्या फायली अपडेट करुन मुंबईकडे धावही घेतली. सर्व अधिकारी एकत्र जमाही झाले होते. शालेय शिक्षणमंत्र्यांनी बोलाविल्यामुळे काही अधिकाऱ्यांची धाकधुकही वाढली होती.

आत्तापर्यंत कोणकोणत्या विभागात काम केले, कामाचा अनुभव किती वर्षांचा आहे, उल्लेखनिय काम काय केले, कोणत्या कार्यालयात पदोन्नती हवी आहे, पदोन्नती मिळाल्यास शिक्षण विभागाच्या प्रगतीसाठी काय बदल घडवून आणणार अशा अनेक प्रश्‍नांद्वारे शिक्षणमंत्र्यांनी मुलाखतींच्या माध्यमातून अधिकाऱ्यांचा कल जाणून घेतला. यात उपस्थित असलेल्या काही अधिकाऱ्यांनी सर्वश्रेष्ठ असल्याने आपल्याला हवा तोच विभाग मिळावा असा आग्रहही धरला. दरम्यान काही अधिकाऱ्यांनी शासन संधी देईल त्या ठिकाणी उत्तम काम करुन दाखवू असे दर्शवून सोज्वळपणा दाखविण्याची संधीही साधली.

कटकटीच्या विभागात पदोन्नती नकोच…
शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नत्या देण्यासाठी शासनाने अधिकाऱ्यांना खेळवत ठेवले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना पदोन्नतीचे आता फारसे सुख-दु:ख राहिलेलेच नाही. या पदोन्नतीतून अधिकाऱ्यांना केवळ दरमहा पाच हजार रुपयांची पगारवाढ मिळण्याची शक्‍यता आहे. मात्र, संबंधित कार्यालयातील गडबडी निस्तरण्याचे काम पदोन्नती मिळणाऱ्या नवीन अधिकाऱ्यांनाच करावे लागणार आहे. काही कार्यालयांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागांची करडी नजर कायमच असते. त्यामुळे काही अधिकाऱ्यांनी कटकटीच्या विभागात पदोन्नती नकोच असा पवित्रा घेतला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.