आरोग्य कर्मचाऱ्यांचा अनोखा पाहुणचार करीत दिली कौतुकाची थाप
बारामती (पुणे)- महामारीविरोधात लढताना प्रशासन आणि नागरिक यांच्यामध्ये समन्वय राखून नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने गेली सहा महिने अविरत परिश्रम घेतले आहेत. या परिश्रमांची दखल घेत बारामती पोलीस प्रशासनाच्या वतीने नगर परिषद आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबवला.
नगरपरिषदेच्या आवारात चहापान कार्यक्रमाचे आयोजन करून पोलीस प्रशासनाने आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून कृतज्ञता व्यक्त केली. करोनाने अनेक समीकरणे बदलली असली तरीदेखील हा छोटेखानी कार्यक्रम मात्र लक्षवेधी ठरला. बारामती शहर व तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे; मात्र गेली सहा महिने अविरतपणे कार्यरत राहून नागरिकांची काळजी घेत असलेल्या नगर परिषदेतील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. ही बाब ओळखून येथील पोलीस प्रशासनाने आरोग्य विभागाच्या करोनायोद्ध्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरिक्षक औदुंबर पाटील, सहायक निरीक्षक योगेश शेलार, फौजदार पद्मराज गंपले यांनी रस्त्यावर उतरुन काम करणाऱ्या सर्वच आरोग्य विभागाच्या व नगरपालिकेच्या कायमस्वरुपी तसेच कंत्राटीही कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांना ऊर्जा देण्याचे काम केले.
- बारामतीकरांना तुमचा अभिमान वाटतो
वैश्विक महामारीच्या काळात पोलिसांप्रमाणे तुम्ही देखील स्वतःच्या कुटुंबासारखी इतरांच्या कुटुंबाची देखील काळजी घेत आहात. आरोग्यबाबत जनजागृती करत असताना सॅनिटायझर व ग्लोव्हजचा वापर नियमित करावा. तुम्ही करत असलेल्या कामाचा बारामतीकरांना अभिमान वाटतो अशा शब्दात उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर व पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी आरोग्य विभाग कर्मचारी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.
- पोलीस प्रशासनाने आमच्या कामाची दखल घेत चहापान कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला ऊर्जा देण्याचे काम केले आहे. बारामतीकरांनी दाखवलेला संयम दिलेले प्रेम व प्रतिसादामुळे इथून पुढील काळात देखील काम करण्याची ही ऊर्जा कायम राहील.
–राजेंद्र सोनवणे, आरोग्य निरीक्षक बारामती नगरपरिषद