‘…अशी दंडुकेशाही चालणार नाही’;भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला इशारा

निदर्शनेसुद्धा करायची नाहीत का?

पुणे- ‘अयोध्या राम मंदिराविरोधात सतत विरोधी मुद्दे उपस्थित केले जात आहेत. यामध्ये शिवसेनेने सुरात सूर मिसळू नये. तुम्ही काही लिहिले, तर रोषही व्यक्त करायचा नाही, अशी दंडुकेशाही चालणार नाही,’ असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला दिला. गुरुवारी पुण्यात आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“500 वर्षांच्या संघर्षांनंतर अयोध्या येथे श्रीराम जन्मस्थानी भव्य मंदिर निर्माण होत आहे. ते सर्वांच्या सलोख्याने होत आहे. त्यात अडथळा निर्माण करण्यासाठी रोज नवा मुद्दा उपस्थित करायचा प्रयत्न काही राजकीय पक्ष आणि देशविरोधी ताकदींनी चालवला आहे.

पण, स्वतःला राष्ट्रीय बाण्याचे म्हणवणारी शिवसेना त्याला पाठिंबा कशी देते? राम मंदिराबाबतचा विषय हा भाजप किंवा विश्‍व हिंदू परिषदेचा किंवा मंदिराच्या ट्रस्टचा नाही, तर सर्व हिंदूंचा आहे. कार्यकर्त्यांनी परवानगी घेऊन शिवसेना भवनाबाहेर निदर्शनेसुद्धा करायची नाही का?,’ असा सवाल पाटील यांनी विचारला.

आरक्षणप्रश्‍नी सविस्तर चर्चा आवश्‍यक
“मराठा आरक्षण कायदा लागू असताना ज्या उमेदवारांच्या सरकारी नोकरीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्यांना नियुक्ती पत्र देणे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल करणे हे उपाय तातडीने करण्यासारखे आहेत.

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत देवेंद्र फडणवीस सरकारने दिल्या, तशा सवलतीही द्यायला हव्यात. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण, पदोन्नतीतील आरक्षण या विषयांवर चर्चा करण्यासाठी किमान दोन दिवस राखून ठेवावेत,’ अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.