महिनाभरात एकही अतिक्रमण विरोधी कारवाई नाही
पुणे – महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे. लॉकडाऊनच्या सात महिन्यांत 37 व्यावसायिक वाहनांवर जॅमर कारवाई केलेल्या पालिकेने 2 ते 27 ऑक्टोबरदरम्यान एकही कारवाई केलेली नाही, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, दिवाळीपर्यंत कारवाई थंडच राहील, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेच्या कामात अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना जुंपले असून हे काम नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत सुरू राहील.
परिणामी, अतिक्रमण करणाऱ्यांवर तोपर्यंत कारवाईच होणार नसल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे अनधिकृत विक्रेत्यांचा तसेच व्यावसायिक वाहनांचा सुळसुळाट गल्लोगल्ली पुन्हा दिसत आहे.करोना पार्श्वभूमीवर विक्रेत्यांकडे होणाऱ्या गर्दीमुळे ते धोक्याचे ठरणार आहे.