पायाच्या दुर्मीळ कर्करोगाने ग्रस्त येमेनी व्यक्‍तीवर यशस्वी उपचार

पुणे – पायाच्या दुर्मीळ कर्करोगाने ग्रस्त चाळीस वर्षीय येमेन येथील व्यक्तीवर डॉक्‍टरांनी यशस्वी उपचार केले. खालिद अब्दुल्ला असे या रुग्णाचे नाव असून त्यांना आता चालणे शक्‍य झाल्याचे डॉक्‍टरांनी म्हटले आहे.

पायात (जांघेच्या ठिकाणी) मोठी गाठ असल्यामुळे स्थानिक डॉक्‍टरांकडे उपचार सुरू केले. मात्र, त्याचे निदान होत नाही आणि उपचाराचा फरकही पडत नव्हता. त्यातच एका डॉक्‍टरांनी “पाय कापावा लागेल’ असे सांगितल्यामुळे अब्दुल्ला घाबरून गेले. त्यानंतर ते रूबी हॉल क्‍लिनिक येथील वरिष्ठ कर्करोगतज्ज्ञ डॉ. मिनिष जैन यांना भेटले. त्यांनी सर्व तपासण्या केल्या असता त्यांना पायाचा कर्करोग असल्याचे निदर्शनास आले.

त्याबाबत डॉ. जैन म्हणाले, अब्दुल्ला जेव्हा मला भेटायला आले, तेव्हा त्याला चालता येत नव्हते. त्यांच्या जांघेच्या ठिकाणी तब्बल 13 ते 14 सें.मी. इतकी मोठी गाठ दिसत होती. त्याला “एनएचएल-डीएलबीसीएल लेग टाईप’ असे म्हणतात. हा कर्करोगाचा दुर्मीळ उपप्रकार आहे. ही गाठ का होते, याचे ठोस कारण अजून माहिती नाही. त्यांच्यावर केमोथेरपी उपचार सुरू केले. 5 महिन्यांच्या उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. खालिद अब्दुल्ला म्हणाले, “शस्त्रकियेविना माझा पाय बरा झाल्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो. कारण मला पाय कापण्याचा सल्ला दिला त्यावेळी मी खूप घाबरलो होतो. मात्र आता मी स्वत:च्या पायावर चालू लागतो आहे.’

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.