जामखेड – आमदार रोहित पवार व येथील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रमेश भोईटे यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या हृदयरोग शिबिरात 307 रुग्णांची मोफत अँजिओग्राफी, 29 रुग्णांची बायपास सर्जरी व तब्बल 109 रुग्णांवर मोफत अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या शिबिरामुळे सामान्य रुग्णांचा सुमारे अडीच कोटींचा खर्च वाचला.
गेल्या काही वर्षांपासून आ. पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अनंत आरोग्य अभियान राबवित आहेत. या अभियान व बारामतीतील कै. रा. तु. भोईटे प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने बारामतीत ते अँजिओप्लास्टी व हृदय शस्त्रक्रियेचे शिबिर भरवत आहेत. चार वर्षांत या शिबिरातून एक हजार 161 अँजिओग्राफी व 498 अँजिओप्लास्टी व 52 बायपास सर्जरी करण्यात आल्या आहेत. या शिबिरात राज्यभरातील रुग्ण सहभागी होत आहेत. आ. पवार यांनी बारामती तालुक्यातील शिर्सूफळ जिल्हा परिषद गटाचे सदस्य झाल्यानंतर ही हृदयरोग शिबिराची संकल्पना मांडली.
त्यास प्रतिसाद देत डॉ. भोईटे यांनी या शस्त्रक्रिया विविध योजनांचे साह्य घेऊन व लाभार्थ्यांचीही आर्थिक स्थिती लक्षात घेऊन मोफत करण्याची तयारी दाखविली. आ. पवार यांनी त्यासाठीचा खर्च उचलण्याची तयारी दाखवली. त्यातून सन 2016 पासून ही शिबिरे आयोजित केली जात आहेत. आजवर या शिबिरांमधून रुग्णांचे दरवर्षी 2 ते 2.50 कोटी रुपयांचा खर्च वाचण्यास मदत झाली. चार वर्षांत 8.25 कोटी रुपयांचा रुग्णांचा खर्च वाचला. कर्जत येथील जगन्नाथ म्हेत्रे यांना एका वर्षापासून हृदयरोगाचा त्रास होता. या शिबिरात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे ते आता शेतीतील काम व इतर दैनंदिन कामे विनासायास करीत असल्याचे विजय म्हेत्रे यांनी सांगितले.
आ. पवार म्हणाले, या शिबिरांच्या माध्यमातून सामान्य कुटुंबावर आलेले आजाराचे संकट कमी करण्याचा प्रयत्न होतोय, हे महत्त्वाचे आहे. या शिबिरात पुणे, नगर तसेच इतरही ठिकाणच्या रुग्णांना वाटल्यास पुण्यातील दवाखान्यांमध्येही मोफत शस्त्रक्रिया व अल्प दरात अँजिओग्राफीची व्यवस्था करू. हृदयविकाराचा त्रास असलेल्या रुग्ण अथवा नातेवाईकांनी गिरिराज हॉस्पिटल किंवा आ. रोहित पवार यांच्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.