तळेगाव दाभाडे,(वार्ताहर) – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा येत्या शुक्रवारी १६ रोजी सकाळी नऊ वाजता तळेगावमध्ये येत आहे. यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे.
मारुती मंदिर चौकाजवळील थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळेच्या मैदानावर पावसामुळे गैरसोय होऊ नये म्हणून मंडप उभारण्यात आला आहे. कार्यक्रमस्थळी येणाऱ्या रस्त्यांवर स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. रस्त्याच्या दुतर्फा पक्षाचे झेंडे लावण्यात आले आहेत.
या जनसन्मान यात्रेची सुरुवात नाशिकमध्ये झाली. त्यानंतर नगर जिल्ह्यातून ही यात्रा पुणे जिल्ह्यात प्रवेश करेल. या यात्रेदरम्यान अजितदादा प्रामुख्याने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ तसेच अन्य शासकीय योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधणार आहे.
या जनसन्मान यात्रेत उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचा समावेश आहे.
मावळ तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत ५० हजारांहून अधिक माता-भगिनींनी नावनोंदणी केली.
या योजनेचा लाभ तालुक्यातील किमान ८० हजार भगिनींना मिळाला पाहिजे, हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून आपले प्रयत्न सुरू आहेत. या सर्व भगिनींनी कार्यक्रमाला येऊन अजितदादांना राखी पौर्णिमेनिमित्त भेट द्यावी, असे आवाहन आमदार शेळके यांनी पत्रकाव्दारे केले.
रक्षाबंधन संपन्न होणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे तालुक्यातील महिलांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने रक्षाबंधनाचा कार्यक्रम देखील होणार आहे.
या कार्यक्रमात तालुक्यातील हजारो भगिनी सहभागी होणार असून अजितदादा व आमदार शेळके यांना प्रतिनिधिक राखी बांधून आभार व्यक्त करणार आहेत.
राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह विविध लोकोपयोगी योजना, जनहितासाठी घेतलेले निर्णय याची माहिती अजितदादा या जन सन्मान यात्रेच्या निमित्ताने जनतेला देणार आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी भगिनींशी संवाद साधून आढावा घेणार आहेत. शेती पंपांवरील वीज बिल माफी तसेच मावळातील पर्यटन, कृषी पर्यटनाला कशी गती मिळेल याबाबत अजितदादा मार्गदर्शन करणार आहेत. सुनिल शेळके, आमदार, मावळ विधानसभा