नवी दिल्ली : कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी अखेर सिद्धरामय्या विराजमान होणार आहेत तर डीके शिवकुमार हे उपमुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उद्या म्हणजेच २० मे रोजी शपथविधी सोहाळा पार पडणार आहे. यावेळी डीके शिवकुमार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान या शपथविधीची जय्यत तयारी सुरु झाली आहे. त्यातच या शपथविधीसाठी देशभरातील अनेक नेत्यांना आमंत्रणं पाठवण्यात आली असून या कार्यक्रमासाठी विरोधी पक्ष नेते देखील उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
काँग्रेसने कर्नाटकवर २२४ पैकी १३५ जागावंर दणदणीत विजय मिळवून सत्ता काबीज केली. परंतु, निवडणूक जिंकल्यानंतरही मुख्यमंत्री पदासाठीचा पक्षासमोर पेच कायम राहिला होता. डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यात चूरस निर्माण झाली. तब्बल ४८ तासांहून जास्त वेळा नंतर या वादावर पडदा पडला आणि सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री आणि डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री करण्यावर शिक्कमोर्तब झाला आहे. दरम्यान, उद्या २० मे रोजी कर्नाटकात शपथविधी सोहळा होणार आहे. यावेळी अनेक मंत्रीही मंत्रीपदाची शपथ घेतील.
या शपथविधी सोहळ्याला सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. तर, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, तामिळनाडूचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार एनसी अध्यक्ष फारुख अब्दुल्ला आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनाही आमंत्रण पाठवण्यात आले आहे. याविषयीची माहिती एका वृत्तसंस्थेने दिले आहे.
सिद्धरामय्या हे कर्नाटकच्या राजकारणातले मोठे नाव आहे. पेशाने वकील असणारे सिद्धरामय्या हे १९७८ पासून सक्रिय राजकारणात आहेत. सिद्धरामय्यांच्या आई-वडिलांना वाटत होतं की, त्यांनी डॉक्टर व्हावे. मात्र सिद्धरामय्यांनी वकील व्हायचा निश्चय केला. त्यानंतर वकिली सोडून ते राजकारणात आले. भूकमुक्त कर्नाटक हे त्यांच स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ते वाटचाल करु लागले.